रामानंदाचार्य संप्रदाय सिंधुदुर्गच्या वतीने ५ वे देहदान
सावंतवाडी : जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या दिव्य प्रेरणेतून आज संपूर्ण भारतभर देहदान आणि अवयव दान चळवळ मोठ्या प्रमाणावर उभी राहिली आहे. भावी डॉक्टर चांगल्या पद्धतीने घडले पाहिजेत आणि त्यांना अभ्यासासाठी मृतदेहाची उपलब्धता व्हावी, या उदात्त हेतूने प्रेरित होऊन रामानंदाचार्य संप्रदाय सिंधुदुर्गच्या वतीने आज शासकीय परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे ५ वे देहदान करण्यात आले.
काल रात्री निरवडे येथील रहिवासी गौरेश बाबू पेडणेकर यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनानंतर, हिंदू धर्मगुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज यांनी केलेल्या समाजोपयोगी आवाहनाला प्रतिसाद देत, पेडणेकर कुटुंबियांनी गौरेश यांचे देहदान करण्याचा अत्यंत महत्त्वाचा आणि धाडसी निर्णय घेतला. दिवंगत गौरेश यांच्या पश्चात आई, वडील, २ भाऊ, वहिनी आणि बहिणी असा मोठा परिवार आहे. या दुःखद प्रसंगातही पेडणेकर कुटुंबाने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
देहदान प्रक्रियेच्या वेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रमुख डॉ. दवंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, शरीरशास्त्र विभाग प्रमुख प्राजक्ता थेटे, नेत्र शल्य चिकित्सक डॉ. बाळासाहेब जोशी, नेत्र चिकित्सा अधिकारी डॉ. कौस्तुभ देशपांडे, नेत्रदान समुपदेशक सिद्धार्थ कांबळे आणि कर्मचारी गोसावी आदी संबंधित अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी रामानंदाचार्य संप्रदाय सिंधुदुर्ग जिल्हा कमिटीचे पदाधिकारी, सावंतवाडी तालुकाध्यक्ष आणि स्वामींचे भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वामी नरेंद्रचार्यजी महाराजांच्या प्रेरणेने सुरू असलेल्या या चळवळीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात देहदानाविषयी मोठी जनजागृती निर्माण होत असल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.












