लांजा ब्रेकिंग: न्यूज जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत निर्णय होऊनही जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळ सत्रात भरत नाहीत

प्रचंड उन्हामुळे विद्यार्थी हैराण, पालकांतून नाराजीचा सूर

संतोष कोत्रे
लांजा -: पाऊस लांबल्याने व कडाक्याच्या उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळ सत्रात ७.३० ते ११.३० या वेळेत भरण्यात याव्यात, या शिक्षक संघटनांनी केलेल्या मागणीनुसार जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत चर्चा आणि एकमत होऊनही प्रशासनाकडून अद्यापही कार्यवाही न झाल्याने पालकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
यावर्षी जून महिन्याची २० तारीख आली तरी पावसाची चिन्हे नसल्याने तीव्र पाणीटंचाई आणि कडाक्याच्या उन्हामुळे लोक हैराण झाले आहेत. विद्यार्थीही या कडाक्याच्या उन्हाने हैराण होत आहेत. त्यामुळे जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत शाळा सकाळ सत्रात म्हणजेच सकाळी ७.३० ते ११.३० या वेळेत घेण्यात याव्यात, अशी मागणी जिल्हा तसेच तालुक्यातील सर्वच प्राथमिक शिक्षक संघटनांच्या वतीने करण्यात आली होती.
शिक्षक संघटनांची ही रास्त मागणी लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या बुधवारी १७ जून रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत या विषयावर चर्चा होऊन शाळा सकाळ सत्रात भरवण्याबाबत एकमत झाले होते. तसा निर्णय देखील स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यामुळे शाळा सकाळ सत्रात भरणे आवश्यक असताना देखील प्रशासनाकडून मात्र अद्याप याबाबत कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे शिक्षक संघटनातून देखील आश्चर्य व्यक्त केले जात असून पालकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
विशेष बाब म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याच्या नजीकच्या रायगड आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यात शुक्रवारी १९ जून पासून शाळा सकाळ सत्रात भरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र रत्नागिरी जिल्ह्यात अद्यापही तसा निर्णय झालेला नसल्याने आश्यर्य व्यक्त केले जात आहे.