रा. सि.बेर्डे विद्यालयात ‘मैत्री फाउंडेशन’तर्फे मोफत वह्या वाटप कार्यक्रम संपन्न!

​लांजा (प्रतिनिधी): मैत्री फाउंडेशन साटवली पंचक्रोशी’ या संस्थेच्या वतीने रा. सि. बेर्डे माध्यमिक विद्यालय साटवली येथे मोफत वह्या वाटप कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला शालेय कमिटीचे उपाध्यक्ष महेश नारकर, मुख्याध्यापक श्री. कदम, मैत्री फाउंडेशनचे सचिव राजन सुर्वे, उपखजिनदार संदीप बापेरकर, मार्गदर्शक ॲड. ओंकार गांगण आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.कदम यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. प्रास्ताविक करताना त्यांनी मैत्री फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचा गौरव केला.
​यानंतर मैत्री फाउंडेशन संस्थेचे सचिव राजन सुर्वे यांनी मनोगत व्यक्त करताना आपल्या भाषणात संस्थेचा मुख्य हेतू, आजवरचा प्रवास आणि भविष्यातील सामाजिक कार्याची रूपरेषा याबद्दल उपस्थितांना सविस्तर माहिती दिली.
​ कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर वह्या वाटपाचा कार्यक्रम पार पडला. सूत्रसंचालन शिक्षक श्री.भालेकर यांनी केले.आभार प्रदर्शनाने या कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी शाळेतील शिक्षकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.