नाट्य-चित्रपट रंगकर्मी श्रीनिवास नार्वेकर यांचे २४ जून रोजी सावंतवाडीत मोफत व्याख्यान

​सावंतवाडी:
सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, नाट्य-चित्रपट रंगकर्मी आणि आवाज तज्ञ श्रीनिवास नार्वेकर यांच्या मोफत व्याख्यानाचे आयोजन बुधवार, दिनांक २४ जून रोजी सायंकाळी ५:०० वाजता खासकीलवाडा येथील पाटणकर वाड्यातील ‘मुक्ताई ॲकेडमी’मध्ये करण्यात आले आहे. मुक्ताई ॲकेडमी, बालरंग आणि व्हिजन व्हाॅईस एन ॲक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

​कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आणि आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी स्वतःचा आवाज आणि देहबोली (बॉडी लँग्वेज) प्रभावी असणे अत्यंत आवश्यक असते. या पार्श्वभूमीवर, व्यक्तिमत्त्व विकासात आवाज आणि देहबोलीचे महत्त्व या विषयावर श्रीनिवास नार्वेकर मार्गदर्शन करणार आहेत. नार्वेकर हे गेल्या २७ वर्षांपासून लेखन, दिग्दर्शन, अभिनय आणि आवाज-देहबोली या क्षेत्रांत अविरत कार्यरत आहेत. त्यांच्या महाराष्ट्रातील कार्यशाळांना नेहमीच उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, मुंबई विद्यापीठाच्या नाट्यविषयक पदव्युत्तर अभ्यासक्रम व ॲक्टिंग डिप्लोमा कोर्ससाठी निमंत्रित व्याख्याता म्हणूनही त्यांची नियुक्ती झाली आहे.

​गेल्या वर्षी सावंतवाडी येथे मुलांसाठी यशस्वी अभिनय कार्यशाळा घेण्यात आली होती आणि आगामी काळातही मुलांसाठी बालनाट्याचे आयोजन केले जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

​या व्याख्यानाचा लाभ शालेय विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष श्री. कौस्तुभ पेडणेकर सरांनी केले आहे. व्याख्यान मोफत असले तरी आसनव्यवस्था मर्यादित असल्याने इच्छुकांनी नावनोंदणीसाठी श्री. कौस्तुभ पेडणेकर यांच्या ८००७३८२७८३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे सांगण्यात आले आहे.