‘प्रहार डिजिटल’चा इफेक्ट! अखेर सोमवारी २२ जून पासून जि. प. शाळा भरणार सकाळ सत्रात

जि प मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे शिक्षण विभागाला परिपत्रक जारी

संतोष कोत्रे
लांजा-: प्रहार डिजिटल च्या वृत्ताची दखल घेत सोमवारी २२ जून पासून जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळ सत्रात म्हणजे सकाळी ७.३० ते ११.३० यावेळेस भरणार आहेत. याबाबतचे परिपत्रक रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी शनिवारी शिक्षण विभागाला जारी केले आहे. त्यामुळे पालक वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.
यावर्षी जून महिन्याची २० तारीख आली तरी पावसाची चिन्हे नसल्याने तीव्र पाणीटंचाई आणि कडाक्याच्या उन्हामुळे लोक हैराण झाले आहेत. विद्यार्थीही या कडाक्याच्या उन्हाने हैराण होत आहेत. त्यामुळे जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत शाळा सकाळ सत्रात म्हणजेच सकाळी ७.३० ते ११.३० या वेळेत घेण्यात याव्यात, अशी मागणी जिल्हा तसेच तालुक्यातील सर्वच प्राथमिक शिक्षक संघटनांच्या वतीने करण्यात आली होती.
शिक्षक संघटनांची ही रास्त मागणी लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या बुधवारी १७ जून रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत या विषयावर चर्चा होऊन शाळा सकाळ सत्रात भरवण्याबाबत एकमत झाले होते. तसा निर्णय देखील स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यामुळे शाळा सकाळ सत्रात भरणे आवश्यक असताना देखील प्रशासनाकडून मात्र अद्याप याबाबत कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे शिक्षक संघटनातून देखील आश्चर्य व्यक्त केले जात असून पालकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत होती.
याबाबतचे वृत्त प्रहार डिजिटल ने शनिवारी दुपारी प्रसिद्ध केले होते. अखेर या वृत्ताची दखल जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने घेतले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी शनिवारी दुपारी परिपत्रक जारी केले आहे. यावर्षी लांबलेला पाऊस आणि त्यामुळे निर्माण झालेल्या हवामान बदल, प्रचंड उघडा आणि उष्णतेची लाट लक्षात घेता, तसेच तीव्र पाणीटंचाई लक्षात घेता याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य देखील सुरक्षित रहावे आणि त्यांच्या शिक्षणात देखील खंड पडू नये या गोष्टींचा विचार करून सोमवार दिनांक २२ जून पासून शाळा सकाळ सत्रात भरविण्याच्या सूचना त्यांनी या परिपत्रकात दिल्या आहेत. तसेच ३० जून अथवा पाऊस सुरू होण्याचा दिनांक याबाबतची परिस्थिती लक्षात घेऊन त्यानंतर शाळा या नियमित वेळेस भरविण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी केल्या आहेत.