योग म्हणजे निरोगी, संतुलित आणि आनंदी जीवनाचा मंत्र – महंत गावडे काका महाराज

माळ्याचीवाडी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा; योगशिक्षक विद्यालयाच्या माध्यमातून विशेष योगशिबिर

स्वप्निल कदम -कुडाळ : आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने श्री श्री श्री 108 महंत मठाधीश श्री गावडे काका महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या योगशिक्षक विद्यालयाच्या माध्यमातून आयोजित योगशाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने योगसाधक, योगशिक्षक आणि मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना महंत गावडे काका महाराज यांनी योगाचे मानवी जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व विशद केले. योग ही केवळ व्यायामपद्धती नसून शरीर, मन आणि आत्म्याचा समतोल साधणारी जीवनशैली असल्याचे त्यांनी सांगितले. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते, असेही त्यांनी नमूद केले.

महंत गावडे काका महाराज व भक्त सेवा न्यास यांच्या माध्यमातून आजपर्यंत 100 हून अधिक योगशिक्षक समाजाला घडविण्यात आले असून हे प्रशिक्षित योगशिक्षक विविध ठिकाणी योगप्रसाराचे कार्य करत आहेत. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय योग दिन घोषित होण्यापूर्वीच गेली अनेक वर्षे दरवर्षी 21 जून रोजी त्यांच्या माध्यमातून योगवर्गांचे आयोजन केले जात होते. वर्षातील सर्वात मोठा दिवस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 21 जून या दिवसालाच नंतर आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून मान्यता मिळाल्याचा उल्लेखही यावेळी करण्यात आला.

या प्रसंगी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे योगशिक्षक श्री आनंद सावंत यांनी उपस्थितांना योगाचे वैज्ञानिक महत्त्व, आरोग्यदायी जीवनशैली आणि दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करण्याचे फायदे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास श्री सुजय गावडे, सौ. श्वेता कोरगावकर (माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष, सिंधुदुर्ग), माजी सभापती तथा भाजपा तालुकाध्यक्ष श्री संजय वेंगुर्लेकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री बंड्या सावंत, प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री राजू राऊळ, महिला जिल्हा सरचिटणीस सौ. अदिती सावंत, जिल्हा परिषद सदस्य तथा महिला तालुकाध्यक्ष कुडाळ सौ. आरती पाटील, पंचायत समिती सदस्य श्री मंगेश प्रभू, नगरसेवक श्री उदय मांजरेकर, नगरसेविका सौ. श्रेया गावंडे, माजी नगरसेवक श्री राजू गावंडे तसेच भक्त सेवा न्यास, माळ्याचीवाडी येथील योगसाधक व योगशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात विविध योगासने, प्राणायाम व ध्यानसाधनेचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. योगाच्या माध्यमातून निरोगी समाज निर्माण करण्याचा संकल्प उपस्थितांनी यावेळी व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.