ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत उदय निरगुडकर यांचे गौरवोउद्गार
वाशिष्ठी डेअरीला सदिच्छा भेट देऊन डॉ. निरगुडकर यांनी केली पाहणी; प्रकल्पाचे कौतुक
चिपळूण (प्रतिनिधी): ज्येष्ठ पत्रकार, अभ्यासक आणि विचारवंत डॉ. उदय निरगुडकर यांनी शनिवारी सायंकाळी वाशिष्ठी डेअरीला सदिच्छा भेट दिली. यावेळी संपूर्ण प्रकल्पाची पाहणी करून डॉ. निरगुडकर यांनी माहिती घेतली आणि प्रकल्पाचे कौतुक केले. वाशिष्ठी डेअरीची पाहणी करताना आणि उत्पादनांविषयी माहिती घेताना डॉ. उदय निरगुडकर यांनी ‘प्रशांत यादव आपण वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून चमत्कार घडवला आहे’, असे गौरवोउद्गार काढले आणि प्रशांत यादव यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. यावेळी डॉ. निरगुडकर यांनी आवर्जून वाशिष्ठी डेअरीच्या मँगो लस्सी आणि आईस्क्रीमची चव घेतली अन् ‘अप्रतिम’ अशा एका शब्दात उत्पादनांचेही कौतुक केले.
ज्येष्ठ पत्रकार विचारवंत तथा अभ्यासक डॉ. उदय निरगुडकर हिंदुत्व: भारतीयत्वाची व्यापक संकल्पना या विषयावरील व्याख्यानासाठी शनिवारी चिपळूणमध्ये आले होते. दरम्यान, पिंपळी खुर्द येथील वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाला सदिच्छा भेट दिली. यावेळी वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन तसेच भाजपचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव आणि वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक तसेच नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांनी डॉ. निरगुडकर यांचा यथोचित सन्मान केला.
यानंतर डॉ. उदय निरगुडकर म्हणाले की, कोकणाच्या मातीमध्ये कष्ट, प्रामाणिकपणा आणि सहकाराची परंपरा खोलवर रुजलेली आहे. त्या परंपरेला आधुनिक व्यवस्थापन, दूरदृष्टी आणि सामाजिक बांधिलकीची जोड देत वाशिष्ठी डेअरीने उभारलेले कार्य खरोखरच प्रेरणादायी आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, दूध उत्पादक आणि महिला बचत गट यांना आर्थिक सक्षमीकरणाचा मार्ग दाखवणारी ही संस्था केवळ एक डेअरी नसून, ग्रामीण विकासाचे प्रभावी मॉडेल आहे. शिवाय कोकणातील उद्योजकता, आत्मविश्वास आणि सामूहिक शक्तीचे हे एक यशस्वी उदाहरण म्हणून वाशिष्ठी डेअरीकडे पाहिले पाहिजे, असे डॉ.उदय निरगुडकर यांनी आवर्जून नमूद केले.
यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे चिपळूण शाखेचे अध्यक्ष तसेच उद्योजक प्रशांत पटवर्धन, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बळीराम मोरे, जिल्हा चिटणीस योगेश शिर्के, वाशिष्ठी डेअरीचे संचालक महेश खेतले, अविनाश गुडेकर, प्रशांत वाजे, सौ. तृप्ती यादव, वाशिष्ठी डेअरीचे सरव्यवस्थापक लक्ष्मण खरात, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे गणेश कदम, संदीप पाटील, प्रसिद्ध निवेदक अमोल टाकळे आदी उपस्थित होते.












