दोडामार्ग :सुहास देसाई
“केवळ चार-पाच लोकांनी सुरू केलेली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची चळवळ आज देशभरात ६६ हजार शाखांपर्यंत पोहोचली आहे. देश प्रथम मानून, भारताला जगात विश्वगुरू बनवणे आणि हिंदू संस्कृतीचे रक्षण करणे यासाठी ही संघटना रात्रंदिवस कार्यरत आहे,” असे प्रतिपादन कणेरी मठाचे पूज्य अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज यांनी केले. सकल हिंदू यांनी आयोजित भव्य हिंदू संमेलनात ते मार्गदर्शन करत होते.
स्वामीजींनी आपल्या भाषणात भारताची विविधता, गौरवशाली इतिहास आणि सद्यस्थितीतील आव्हाने यांवर सविस्तर प्रकाश टाकला.देशाची विविधता आणि संघाचे कार्य याबाबत
स्वामीजी म्हणाले की, भारतात १५०० हून अधिक बोलीभाषा, विविध जनजाती आणि कोकण, सह्याद्री, मराठवाडा, विदर्भ, खान्देश, गुजरात, कच्छ ते पंजाबच्या मैदानी प्रदेशापर्यंत पसरलेली भौगोलिक विविधता आहे. जगात येणारी सर्व पिके भारतात येतात. आज लोकसंख्येच्या बाबतीत भारताने चीनला मागे टाकले आहे. या अथांग देशात लहान मुले, महिला उद्योजक, कामगार आणि शिक्षण अशा प्रत्येक क्षेत्रात संघ मोलाचे कार्य करत आहे.
परकीय आक्रमणे आणि हिंदूंचे अस्तित्व याविषयीं बोलताना म्हणाले की,
”आपला देश दहशतवादाच्या सावटात आणि शेजारी देशांच्या आव्हानांमध्ये वेढलेला आहे. मोगल, इंग्रज यांसारख्या परकीय आक्रमकांनी भारतावर हल्ले केले. युरोपसारखी संस्कृती ५० वर्षांत संपली, पण दोन हजार वर्षांच्या परकीय आक्रमणांनंतरही भारतातील हिंदू समाज आजही टिकून आहे. जगात १०० कोटींहून अधिक हिंदू आहेत, मात्र नेपाळसारखा हिंदू देश संपला, ही चिंतेची बाब आहे,” असे स्वामीजी म्हणाले.
खरा इतिहास सांगण्याची गरज
इतिहासाचा संदर्भ देत ते म्हणाले, “राणा संग यांनी बाबरला, तर पृथ्वीराज चव्हाण यांनी गजनीला ठोकून काढले होते. मात्र, अंतर्गत फितुरीमुळे आणि भावकी विरोधकांना मिळाल्यामुळे इतिहास बदलला. एकेकाळी इराणपर्यंत भारताची सीमा होती. दुर्दैवाने आज आपल्याला खरा इतिहास सांगितला जात नाही. जर खरा इतिहास मांडला गेला, तरच हिंदू समाज अधिक जागृत होऊन टिकेल.”
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जोगेंद्रनाथ मंडल यांचा दाखला
फाळणीच्या वेळचा इतिहास सांगताना स्वामीजींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टीचे कौतुक केले. ते म्हणाले:
”डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाची फाळणी होऊ नये आणि देश तुटू नये, अशी ठाम भूमिका घेतली होती. स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी स्पष्ट केले होते की, हिंदू भारतात आणि मुस्लिम पाकिस्तानात राहिले तरच दोन्ही समाज शांततेत राहू शकतील. याउलट, दलित नेते जोगेंद्रनाथ मंडल हे पाकिस्तानच्या आमिषाला बळी पडून तिथे गेले. मात्र, पाकिस्तानात त्यांच्या सर्व अनुयायांची हत्या करण्यात आली आणि शेवटी मंडल यांना कोलकात्यात येऊन बेवारस अवस्थेत प्राण सोडावे लागले.”
स्वामीजींनी पुढे नमूद केले की, बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण स्थान असलेली ‘चैत्यभूमी’ आणि त्यांची इतर सर्व स्मारके हिंदू समाजानेच आदराने उभारली आहेत.
‘हिंदू घटला तर देश तुटला’
”इतिहास साक्षी आहे की, जिथे जिथे हिंदू दुबळा झाला किंवा हिंदूंची संख्या कमी झाली, तिथे तिथे देश तुटला. आज अनेक देश याच कारणामुळे नष्ट झाले. दोन वेगवेगळ्या संस्कृती एकत्र नांदताना हिंदू समाजाने अधिक संघटित होण्याची गरज आहे,” असा इशारा देत स्वामीजींनी हिंदू बांधवांना एकत्र येण्याचे आवाहन केले.
हे संमेलन हिंदू समाजाला जागृत करणारे आणि संघटित होण्याचा संदेश देणारे ठरले, असे सांगत स्वामीजींनी आपल्या भाषणाचा समारोप केला.













