महाराष्ट्राच्या राजकारणातील अभ्यासू, आक्रमक आणि विकासाभिमुख नेतृत्व : पालकमंत्री नितेश राणे

(संतोष राऊळ; कणकवली)

“मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नितेश राणे यांनी पारंपरिक प्रशासनापलीकडे जाऊन तंत्रज्ञानाधारित, रोजगारनिर्मितीला चालना देणारे आणि सागरी अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे अनेक निर्णय घेतले. ड्रोनद्वारे किनारपट्टी सुरक्षा, जहाजबांधणी धोरण, Ro-Ro सेवा, वॉटर मेट्रो, पाण्यावर उडणारी स्वीडन येथील कॅनडेला बोट मुंबईत आणून स्वीडन सारखी बोट सेवा देण्याचा मानस मंत्री नितेश राणे यांचा आहे. मत्स्यव्यवसायासाठी मोठ्या आर्थिक तरतुदी आणि कोकणातील महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांना गती देऊन त्यांनी महाराष्ट्राच्या सागरी विकासाला नवे परिमाण दिले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा पहिला AI (कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित प्रशासन) असलेला जिल्हा तयार केला. कोकण रेल्वेला पश्चिम महाराष्ट्र रेल्वे मार्गाने जोडण्याचा नवा अध्याय सुरू केला. अशा या कर्तृत्ववान नेतृत्वाचा आज वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्त त्यांच्या कार्याला शुभेच्छा देणारा हा अक्षर प्रपंच…”

मंत्री नितेश राणे यांचा राजकीय प्रवास हा संघर्ष, जनसंपर्क, प्रशासनावरील पकड आणि विकासकामांवरील भर यांचा संगम म्हणून पाहिला जातो. आक्रमक राजकीय शैली आणि विकासाभिमुख दृष्टीकोन यांच्या बळावर त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री म्हणून त्यांनी घेतलेले महत्वाचे निर्णय जिल्ह्याच्या आणि राज्याच्या विकासात महत्वपूर्ण योगदान देणारे ठरले आहेत.

मंत्री नितेश राणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा राज्यातील पहिली AI प्रणाली प्रशासनात सुरू करून देशात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव नेले.मत्स्य व्यवसायात प्रगती आणण्यासाठी मच्छीमारांना कृषीचा दर्जा मिळवून दिला. मुंबईत वॉटर मेट्रो, कोकणात बोट बांधणी प्रकल्प , कोल्हापूर वैभववाडी नवा रेल्वे मार्ग,पर्यटन दृष्ट्या महत्त्वाचा असलेला ताज प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणून पर्यटन आणि रोजगाराची नवी समीकरणे पालकमंत्री नितेश राणे मांडत आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षांत आपल्या स्पष्टवक्तेपणा, आक्रमक भूमिका आणि विकासाभिमुख दृष्टिकोनामुळे विशेष ओळख निर्माण करणारे मंत्री नितेश राणे जनसामान्यांच्या प्रश्नांबाबत संवेदनशीलता त्यांच्या कृतीतून दिसते. ऑन द स्पॉट एखादा निर्णयावर जाण्याची त्यांची कार्यप्रणाली जनतेला न्याय देऊन जाते.राजकीय वारशातून जनसेवेचा प्रवास राजकीय पार्श्वभूमी लाभलेली असली तरी स्वतःच्या कार्यशैलीतून आणि जनसंपर्कातून नितेश राणे यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. युवकांशी सातत्याने संवाद, सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग आणि मतदारसंघातील प्रश्नांवर प्रत्यक्ष लक्ष देण्याची त्यांची पद्धत सुरुवातीपासूनच लक्षवेधी ठरली.

मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री म्हणून नितेश राणे यांनी गेल्या दीड वर्षांत काही महत्त्वाचे निर्णय, धोरणे आणि प्रकल्प पुढे नेले आहेत.

*मत्स्यव्यवसाय क्षेत्रासाठी मोठी आर्थिक तरतूद*

2026-27 च्या राज्य अर्थसंकल्पात मत्स्यव्यवसाय क्षेत्रासाठी मुख्यमंत्री मत्स्य व्यवसाय योजनेअंतर्गत सुमारे 1,240 कोटींची तरतूद करण्यात आली. मच्छीमारांना आधुनिक सुविधा, उत्पादनवाढ आणि पायाभूत सुविधांचा विकास यासाठी या निधीचा उपयोग होणार आहे.

 

*मत्स्यव्यवसाय विभागाचे डिजिटल मॉनिटरिंग*

राज्यातील प्रलंबित मत्स्य प्रकल्प, मच्छीमार कल्याणकारी योजना आणि अनुदान योजनांच्या अंमलबजावणीसाठी डिजिटल डॅशबोर्ड तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे योजनांवर थेट देखरेख ठेवणे शक्य होणार आहे.

*महाराष्ट्र किनारपट्टीवर ड्रोन निगराणी*

बेकायदेशीर मासेमारी रोखण्यासाठी महाराष्ट्रातील किनारपट्टीवर ड्रोनद्वारे देखरेख सुरू करण्यात आली. ही योजना राज्यातील मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा वापर वाढविणारी महत्त्वाची पायरी मानली जाते.

 

*जहाजबांधणी, दुरुस्ती आणि पुनर्वापर धोरण*

महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले ज्याने स्वतंत्र जहाजबांधणी, जहाज दुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर धोरण जाहीर केले. या धोरणातून हजारो कोटींची गुंतवणूक आणि मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

*मुंबई-कोकण Ro-Ro सेवा*

पाण्यावर उडणारी स्वीडन येथील कॅनडेला बोट मुंबईत आणून स्वीडन सारखी बोट सेवा देण्याचा प्रयत्न मंत्री नितेश राणे यांचा आहे.

मुंबई-दिघी आणि मुंबई-काशीद Ro-Ro फेरी सेवा सुरू करण्यासाठी कामांना गती देण्यात आली. या प्रकल्पामुळे मुंबई आणि कोकणमधील प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होण्याची अपेक्षा आहे.

 

*सागरी विकास आणि बंदर क्षेत्रातील गुंतवणूक*

महाराष्ट्र मेरीटाइम समिटच्या माध्यमातून राज्याला सागरी व्यापार आणि बंदर विकासाचे प्रमुख केंद्र बनविण्याचा प्रयत्न सुरू आहे. बंदराधारित विकास, उद्योग आणि रोजगारनिर्मितीवर विशेष भर देण्यात आला आहे.

*जलवाहतूक प्रकल्प*

मुंबई व परिसरात वॉटर मेट्रो प्रकल्पाची संकल्पना पुढे नेण्यात आली असून 29 टर्मिनल्स आणि 10 मार्गांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यामुळे रस्ते आणि रेल्वेवरील ताण कमी करण्याचा प्रयत्न आहे.

*सिंधुदुर्ग-कोकणसाठी महत्त्वाचा रेल्वे प्रकल्प*

कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गासाठी केंद्र शासनाने 3,244 कोटींची तरतूद केली असून या प्रकल्पाचा पाठपुरावा नितेश राणे यांनी सातत्याने केला आहे. हा प्रकल्प कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेला कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्ग सत्यात उतरणार आहे.

अशा या कर्तृत्ववान आणि निर्णय क्षमता असलेल्या मंत्रिमितेश राणे यांना मंत्रिपदाच्या दीड वर्षात केलेले काम पाहता माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांचे ते चिरंजीव म्हणून कर्तृत्ववान नेतृत्व सिद्ध झाले आहेच मात्र “बाप सवायी बेटा” अशी प्रतिमा ही निर्माण केली.