लोरे नं. १ येथील घटना
पतीविरोधात कणकवली पोलिसांत गुन्हा दाखल
कणकवली : दारू पिण्यास मर्यादा ठेवण्यास सांगितल्याच्या रागातून पतीने पत्नीला लाकडी आरामखुर्चीच्या दांड्याने डोक्यावर व पायावर मारहाण करून जखमी केल्याची घटना लोरे नं. १ येथे २ ऑक्टोबर रोजी घडली. याप्रकरणी पत्नीने कणकवली पोलिसांत तक्रार दाखल केली असून पतीविरोधात मारहाणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत सारिका स्वप्नील राणे (वय ३०, रा. लोरे नं. १) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, त्या पती स्वप्नील राणे व मुलगा मिहीर यांच्यासह राहतात. त्यांच्या घरालगत असलेल्या खोलीत त्यांची सासू एकटी राहते.
२ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पती स्वप्नील यांना त्यांच्या मित्राचा फोन आला. त्यावेळी सारिका यांनी पतीला दारू पिण्यावर मर्यादा ठेवण्यास सांगितले. याचा राग आल्याने स्वप्नील यांनी बाजूला असलेल्या लाकडी आरामखुर्चीचा दांडा घेऊन सारिका यांच्या डोक्यावर व पायावर मारहाण केली. तसेच पाठीवर लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
यावेळी स्वप्नील यांनी, “जा, तुला काय करायचे ते कर. तुझी मी कशी वाट लावतो ते बघ,” अशी धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी सारिका राणे यांनी पती स्वप्नील शशीकांत राणे (वय ४०, रा. लोरे नं. १, फोंडाघाट) यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार स्वप्नील राणे यांच्याविरोधात मारहाणीचा गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.













