मळेवाड दशकोशीत पहिल्याच पावसात महावितरणची बत्ती गुल; रात्रभर अंधार, नागरिक विचारतायत ‘हे धंदे मुद्दाम चाललेत की काय?’

न्हावेली- श्रेयस गावडे

 

पहिल्याच पावसाने महावितरणच्या तथाकथित ‘मान्सूनपूर्व’ कामांची पुरती पोलखोल केली आहे. पावसाचा जोर अगदी किरकोळ असतानाही मळेवाड दशकोशी परिसरातील वीज पुरवठा रात्रभर खंडित झाला होता. रात्री गेलेली वीज थेट दुसऱ्या दिवशी सकाळी आल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी, “महावितरणचे हे धंदे मुद्दाम चाललेत की काय?” असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे. पहिल्याच पावसात महावितरणचा कारभार पूर्णपणे ‘नापास’ ठरला आहे.

 

दरवर्षी पावसाळ्यापूर्वी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून मान्सूनपूर्व कामे केल्याचा गाजावाजा महावितरणकडून केला जातो. झाडांच्या फांद्या छाटणे, सडलेले खांब बदलणे आणि तारा ओढणे ही कामे कागदावरच राहिली की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. साधा पाऊस आणि नाममात्र वारा असतानाही संपूर्ण दशकोशी अंधारात बुडवणे ही महावितरणची अक्षम्य निष्काळजीपणाची साक्ष आहे.

 

रात्री अचानक वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागला. त्यातच डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींचे अतोनात हाल झाले. महावितरणच्या ढिसाळ आणि बेजबाबदार कारभारामुळे ग्रामस्थांना संपूर्ण रात्र जागून काढावी लागली.

 

“वीज बिल भरण्यास एक दिवस उशीर झाला तर लगेच कनेक्शन कापण्याची धमकी देणारे महावितरणचे अधिकारी, रात्रभर वीज गायब असताना कुठे झोपा काढत होते?” असा तिखट सवाल ग्राहक विचारत आहेत. नियमित बिल वसूल करायचे आणि सेवा मात्र भंगार दर्जाची द्यायची, ही महावितरणची वृत्ती आता सहनशीलतेच्या पलीकडे गेली आहे.

 

मळेवाड दशकोशीतील या वीज समस्येमुळे घरगुती ग्राहकांसह छोटे व्यावसायिक, दुग्ध व्यावसायिक आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. महावितरणने आपला हा ढिसाळ कारभार त्वरित सुधारून वीज पुरवठा सुरळीत न केल्यास, संतप्त नागरिक महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकतील आणि तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.