हर घर योद्धा स्व संरक्षण प्रशिक्षण शिबिर संपन्न चिपळूण (प्रतिनिधी) : आज उच्च शिक्षित वर्ग असलेल्या कॉर्पोरेट क्षेत्रात धर्मांतर करण्याचे षड्यंत्र उघड झाले आहे. मग गाव खेड्यातील हिंदू युवतींची त्या शिक्षण घेत असलेल्या ठिकाणी अथवा काम करत असताना अशा प्रवृत्तींच्या त्रासाला त्यांनाही तोंड द्यावे लागत आहे. यासाठी युवतींनी आपल्या रक्षणासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्याबरोबरच सोबतच्या व्यक्तींचे निरीक्षणही केले पाहिजे आणि सतर्क रहायला हवे, असे प्रतिपादन हिंदुराष्ट्र समन्वय समितीचे सह संयोजक अनुराग उतेकर यांनी केले.
हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या गुरुदक्षिणा सभागृहात १० जून ते १९ जून या कालावधीत ‘हर घर योद्धा ‘ हे शिबिर संपन्न झाले. १९ जून रोजी शिबिराची सांगता झाली. या शिबिराचा लाभ चिपळूण तालुक्यातील १६ युवक-युवतींनी घेतला. सर्व शिबिरार्थिंनी कराटे, लाठी आणि दंडसाखळी प्रशिक्षके सादर केली. तसेच ज्या धर्मप्रेमी युवांनी शिबिरात स्व-संरक्षणाचे अभ्यासक्रम पूर्ण केला त्यांना अनुराग उतेकर आणि प्रशांत उतेकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देण्यात आले.
चिपळूण परिसरातही लव्ह जिहादची प्रकरणे वाढत आहेत, याविषयी प्रशांत ऊतेकर यांनी काही घटना सांगितल्या. यावेळी सनातन संस्थेचे विनायक कांगणे यांनी शारिरीक बलासह आत्मबल वाढण्यासाठी तसेच कार्याला ईश्वरी अधिष्ठान मिळावे यासाठी साधना करण्याचे महत्त्व सांगितले. तसेच हिंदु जनजागृती समितीच्या राष्ट्रीय प्रथमोपचार सेवीका डा. सौ. साधना जरळी यांचेही मार्गदर्शन लाभले.
या शिबिरात काही प्रशिक्षणार्थींनी आपले अभिप्राय व्यक्त केले. यामध्ये कु. मृण्मयी ओक हिने अभिप्राय व्यक्त करताना सांगितले की, मला लाठी शिकायचे होते ते या शिबिरामुळे शक्य झाले. यापुढे समितीच्या बेटी सुरक्षित राष्ट्र सुरक्षित या उपक्रमात सक्रिय सहभागी होणार आहे. आदित्य तांबे हिने प्रशिक्षण केल्यावर आपल्याला सुरुवातीला शारिरीक त्रास जाणवला, पण पुढे नियमित सराव केल्यामुळे चांगले वाटत आहे. यापुढे स्वतः शिकून इतरांना ही शिकवेन असे सांगितले. डॉ. सौ. अवंति गौंड म्हणाल्या की, असे शिबिर नियमित झाले पहिजे. आज महिलांनी स्व संरक्षणाचे धडे घेणे आहेत. नियमित सराव केला तरच आत्मविश्वास वाढेल आणि कठिण परिस्थितीत प्रतिकार करता येईल. पालक विनोद शिंदे यांनी सर्व हिंदुनी योध्दा बनण्याचे प्रशिक्षण घेतले पाहिजे, या कार्यात आपले सदैव सहकार्य राहील असे सांगितले. तर विनित सिनकर यांनी या शिबिरात आल्यावर आपल्याला बल वाढल्यासारखे वाटत आहे असे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. दिव्या घाग यांनी केले.