दापोली उपजिल्हा रूग्णालयातील रिक्त पदांबाबत पत्रकारांचे उपोषण

 

दापोली | प्रतिनिधी : दापोली उपजिल्हा रूग्णालयातील रिक्त पदे त्वरित भरण्यासाठी मराठी पत्रकार परिषद मुंबई शाखा दापोली यांच्या वतीने 15 ऑगस्ट पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मराठी पत्रकार परिषद दापोली शाखेच्या वतीने 26 जानेवारी 2023 रोजी दापोली उपजिल्हा रूग्णालयातील रिक्त पदे भरण्याबाबत उपोषण करण्यात आले होते. मात्र अद्यापही ही रिक्त पदे कायमस्वरूपी न भरल्यामुळे पुन्हा उपोषण करण्यात येणार आहे. यापूर्वा जी दोन पदे कायमस्वरूपी भरण्यात आली होती. त्यातील डॉ. बालाजी सगरे हे प्रतिनियुक्तीवर कळंबणी रूग्णालय येथे कार्यरत असून त्यांची बदली सध्या महाड येथे करण्यात आली आहे. तर दापोलीतील वैद्यकीय अधिक्षक डॉ. महेश भागवत यांची बदली उपजिल्हा रूग्णालय कळंबणी येथे करण्यात आली आहे. त्यामुळे दापोली उपजिल्हा रूग्णालयात कायमस्वरूपी कोणताही वैद्यकीय अधिकारी कार्यरत नाही. त्यामुळे रूग्णांची गैरसोय होत आहे.

एकीकडे शासन सर्व रूग्णालयातील सेवा मोफत करत आहे. तर दुसरीकडे रिक्त पदे भरली जात नाहीत. दापोली उपजिल्हा रुग्णालयातील जनरल सर्जन, एम.डि.मेडिसीन, स्त्री रोग तज्ञ, बालरोग तज्ञ, भुलतज्ञ, अस्थीरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ आदी सर्वच पदे रिक्त आहेत. त्यामुळे या मोफत सेवेचा फायदा रूग्णांना कसा होणार हा प्रश्न विचारला जात आहे.