अनबॉक्स युअर डिझायर’च्या ६ व्या वर्धापनदिनानिमित्त सामाजिक बांधिलकी; रत्नागिरी पोलीस दलाला CCTV प्रणाली सुपूर्द!

रत्नागिरी:
शहरात वाढते गुन्हेगारीचे प्रमाण आणि सातत्याने होणाऱ्या घरफोड्या रोखण्यासाठी, तसेच चोरांना जेरबंद करताना पोलीस प्रशासनाला येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन ‘अनबॉक्स फूड डिलिव्हरी’ (अनबॉक्स युअर डिझायर) तर्फे एक कौतुकास्पद पाऊल उचलण्यात आले आहे. संस्थेच्या ६ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत, पोलिसांना गुन्ह्यांचा तपास करणे अधिक सोयीचे व्हावे यासाठी रत्नागिरी पोलीस दलाला आधुनिक CCTV प्रणाली हस्तांतरीत करण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण उपक्रमामुळे पोलिसांच्या गस्तीला आणि गुन्हे शोध मोहिमेला तंत्रज्ञानाची मोठी मदत होणार आहे.
या CCTV प्रणाली हस्तांतरण कार्यक्रमाला रत्नागिरीतील अनेक प्रमुख शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि उद्योजकांची उपस्थिती लाभली होती. यामध्ये रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. विवेक पाटील सर, क्राईम ब्रँचचे श्री. बोरकर सर, आगाशे स्टोअर्स प्रा. लि. चे सर्वेसर्वा श्री. अनंत आगाशे, नगरसेवक श्री. सौरभ मलुष्टे सर, नाचणे ग्रामपंचायत सरपंच श्री. भैया भोंगले सर, नाचणे ग्रामपंचायत सदस्य सौ. दिप्ती फडके मॅडम, सामाजिक कार्यकर्ते व व्यावसायिक श्री. अमोल सावंत, ओम साई मित्र मंडळ खजिनदार श्री. पराग सावंत आणि मनीष टेक्नो प्रिंटचे श्री. मनीष शिंदे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
या कार्यक्रमाप्रसंगी अनबॉक्स ऑफिसच्या वतीने नेहा गोखले, भाग्यश्री सुर्वे, स्पृहा जोगळेकर, कपिल शेवडे तसेच डिलिव्हरी पार्टनरचे प्रतिनिधी प्रवीण पाटील उपस्थित होते. याशिवाय आगाशे स्टोअर्सचे नितेश वारिशे, आगाशे फूडकोर्टची सानिका नवले आणि नंदाई डिजिटलचे धीरज पाटकर यांनीही उपस्थित राहून या उपक्रमाला पाठबळ दिले. ‘अनबॉक्स फूड डिलिव्हरी’ने आपल्या वर्धापनदिनानिमित्त केवळ व्यावसायिक आनंद साजरा न करता, शहराच्या सुरक्षेसाठी पोलीस दलाला दिलेले हे योगदान रत्नागिरीकरांकडून अत्यंत कौतुकास पात्र ठरत आहे.