शिपोशी खामकरवाडी येथील लोखंडी साकव नादुरुस्त, विद्यार्थी व लोकांचा धोकादायक प्रवास

साकव तातडीने दुरुस्त करावा, ग्रामस्थांची मागणी, जिल्हा परिषद बांधकाम विभागाला निवेदन

संतोष कोत्रे
लांजा -: तालुक्यातील शिपोशी खामकरवाडी येथील विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांची रहदारी असलेला लोखंडी साकव हा अतिशय धोकादायक बनला असून तो केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी या साकवाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबतचे निवेदन ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांना देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, शिपोशी खामकरवाडी येथील ग्रामस्थ आणि विद्यार्थी यांना दैनंदिन कामकाजासाठी म्हणजेच शाळा, दवाखाना, बँका, ग्रामपंचायत इत्यादी ठिकाणी कामासाठी जाण्यासाठी लोखंडी साकव हा एकमेव मार्ग आहे. हा लोखंडी साकव गेल्या काही वर्षांपासून अतिशय जीर्ण आणि नादुरुस्त झाला असून वाहतुकीस तसेच ये -जा करण्यास अतिशय धोकादायक बनला आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून येथील ग्रामस्थ सातत्याने हा साकव दुरुस्त करण्याची मागणी करत आहेत. मात्र त्याबाबत अद्यापही कार्यवाही झालेली नाही.

सद्यस्थितीत हा साकव केव्हाही कोसळून त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही . हा साकव दुरुस्त केला नाही तर पावसाळ्यामध्ये खामकरवाडी येथील ग्रामस्थांचा संपर्क तुटून त्यांची गैरसोय होणार आहे. तसेच भविष्यात जीवित हानी होण्याची मोठी संभावना आहे. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी बांधकाम विभागाने तातडीने पावले उचलून खामकरवाडी येथील नादुरुस्त साकवाची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनावर अनंत महाडिक, संजय गवळी, गंगाराम खामकर, भिकाजी कोटकर, संदीप गवळी सुरज कोटकर, दीपक खेडेकर रुपेश कोटकर, दत्ताराम कोटकर, रवींद्र गवळी आदींसह अन्य ग्रामस्थांच्या सह्या आहेत.