‘बालगंधर्व नांदी ते भैरवी’ संगीतमय कार्यक्रमाला रसिकांचा उदंड प्रतिसाद; सावंतवाडीत नटश्रेष्ठाला स्वरांजली

​सावंतवाडी । प्रतिनिधी :
पन्नास वर्षे नाट्य रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या नटश्रेष्ठ बालगंधर्वांच्या जयंती निमित्त सावंतवाडी येथील ‘क्षितिज इव्हेंट’ या संस्थेने आयोजित केलेल्या “बालगंधर्व नांदी ते भैरवी” या संगीतमय कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या अभिनव कार्यक्रमाची संकल्पना बाळ पुराणिक यांची होती, तर निर्मिती ‘श्री परमेश्वर प्रोडक्शन’ या संस्थेने केली होती.

​कार्यक्रमाचे शानदार उद्घाटन सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून गोवा येथील प्रसिद्ध गायक आणि ऑर्गन वादक दामोदर उर्फ भाई शेवडे, ‘नादब्रह्म’चे अध्यक्ष शिवानंद भिडे आणि ज्येष्ठ गायक कलाकार श्रीपाद चोडणकर प्रामुख्याने उपस्थित होते.

​या सांगीतिक महोत्सवात बालगंधर्वांच्या जन्माच्या वेळची तात्कालीन परिस्थिती, त्यांचा रंगभूमीवरील प्रवेश, त्यांनी रंगभूमीवर अजरामर केलेली नाटके व त्यातील लोकप्रिय पदे, तसेच त्यांच्या आयुष्यातील इतर महत्त्वाचे प्रसंग आणि त्यांच्या जीवनाचा उत्तरार्ध अशा संपूर्ण जीवनप्रवासाचा वेध घेणारी मांडणी करण्यात आली होती.

​कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आघाडीचे प्रसिद्ध शास्त्रीय युवा गायक स्वप्निल गोरे आणि गायिका सौ. राधा जोशी यांनी आपल्या सुश्राव्य सुरावटींनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. या दोन्ही कलाकारांनी ‘बलसागर तुम्ही वीर शिरोमणी’, ‘अरे वेड्या मना तळमळसी’, ‘खरा तो प्रेमा’, ‘नाथ हा माझा मोही’, ‘माडीवर चल ग गडे’, ‘अनृताची गोपाला’, ‘नयनी लाजवित’, ‘मधुकर वन वन फिरत’, ‘चिन्मया सकल’, आणि ‘अगा वैकुंठिच्या राया’ यांसारखी अ नेक लोकप्रिय व कठीण नाट्यपदे सादर केली. ही नाट्यपदे सादर करताना दोन्ही गायकांची तपश्चर्या आणि सखोल अभ्यास त्यांच्या सादरीकरणातून स्पष्टपणे जाणवत होता.

​या गायकांना ऑर्गनवर प्रसाद शेवडे, तबल्यावर अभिनव जोशी आणि तालवाद्यांवर तेजस प्रभूदेसाई यांनी उत्तम साथसंगत केली. संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार निवेदन बाळ पुराणिक आणि सौ. उमा जडये यांनी अतिशय अभ्यासपूर्ण शैलीत केले. बालगंधर्वांच्या सुवर्णकाळाची आठवण करून देणाऱ्या या स्वरमयी सोहळ्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह शेजारील गोवा राज्यातील रसिक मंडळींनी मोठी उपस्थिती लावली होती. रसिकांच्या उत्स्फूर्त दाद आणि उपस्थितीमुळे हा कार्यक्रम प्रदीर्घ काळ स्मरणात राहणारा ठरला.