कणकवली : नाथ पै नगर येथील रहिवासी, सेवानिवृत्त मंडळ अधिकारी तथा विविध सामाजिक संघटनांमध्ये सक्रिय योगदान देणारे ज्येष्ठ समाजसेवक मनोहर रघुनाथ पालेकर (वय ७६) यांचे आज दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने कणकवली शहराच्या सामाजिक, प्रवासी व ज्येष्ठ नागरिक चळवळीतील एक अभ्यासू, तळमळीचा आणि निस्वार्थी कार्यकर्ता काळाच्या पडद्याआड गेला आहे. मनोहर पालेकर यांनी आयुष्यभर विविध सामाजिक, सार्वजनिक व जनहिताच्या विषयांवर निस्वार्थ भावनेने काम केले. ते कणकवली तालुका प्रवासी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, कणकवली तालुका पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष, ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा कणकवलीचे पदाधिकारी, तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी म्हणून कार्यरत होते.
विविध संघटनांमधून त्यांनी सर्वसामान्य नागरिक, प्रवासी, ग्राहक आणि निवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडली व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.
शहरातील सामाजिक, सांस्कृतिक आणि लोकहिताच्या उपक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग असायचा. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी समाजकार्यात स्वतःला वाहून घेतले होते. मनमिळावू स्वभाव, विनोदी वृत्ती, सर्वांना आपलेसे करणारे व्यक्तिमत्त्व आणि अजातशत्रू अशी त्यांची ओळख होती. नाथ पै नगर परिसरात प्रत्येकाशी त्यांनी जिव्हाळ्याचे संबंध जपले होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, जावई, भाऊ, सून, नातवंडे असा परिवार आहे. पुणे येथील उद्योजक विक्रांत पालेकर हे त्यांचे चिरंजीव असून, यशस्वी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संदीप ठाकूर यांचे ते सासरे होत.
त्यांच्यावर शनिवारी कणकवली स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक, राजकीय, प्रशासकीय तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.













