सर्जेकोट येथील युवकाला बेदम मारहाण

गंभीर दुखापत : गोवा बांबोळी येथे उपचार सुरु : अनोळखी व्यक्तींनी मारहाण केल्याचा आरोप

मालवण | प्रतिनिधी : सर्जेकोट पिरावाडी येथील कुणाल नागोजी सादये (२२) या युवकाला शुक्रवारी सायंकाळी कांदळगाव राणेवाडी – हडी मार्गावर अनोळखी व्यक्तींनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. मारहाणीत गंभीर दुखापत झाल्याने त्याला अधिक उपचारासाठी गोवा बांबूळी येथे हलविण्यात आले आहे. कुणाल याची प्रकृती गंभीर आहे.

या घटनेनंतर कुणाल याचे मामा नारायण आडकर यांनी मालवण पोलीस ठाण्यात य
या घटनेची माहिती दिली आहे.

कुणाल याला ओळखीच्या व्यक्तीने मोबाईलवर फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर त्याला त्याठिकाणी लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीवेळी त्याचा मोबाईल घेऊन तोही फॉरमॅट करण्यात आला होता. मारहाणीतून तो आपला जीव वाचवून घरी आला. त्यानंतर त्याच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्याला खाजगी रूग्णालयात नेण्यात आले. त्याने मारहाणीच्या भितीने आपल्या आई-वडीलांना कोणतीही कल्पना दिलेली नव्हती. त्याची प्रकृती अधिकच बिघडल्यानंतर त्याला ग्रामीण रूग्णालयातून आरोस जिल्हा रूग्णालय येथे हलविण्यात आले. उपचार सुरु असताना कुणाल याने या मारहाणीची संपुर्ण माहिती आपल्या मामाला दिली. मामा नारायण आडकर यांनी मोबाईलची तपासणी केली असता त्यामधील सर्व डाटा डिलीट केल्याचे दिसून आले होते. उपचार सुरू असतानाच त्याची प्रकृती अधिकच गंभीर बनली. त्याला अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले आहे. सर्जेकोट सरपंच निलीमा परूळेकर आणि संदीप शेलटकर यांनी या घटनेचा पोलीसांनी गांभिर्याने तपास करून मोबाईल लोकेशनच्या आधारे मारहाणकर्त्यांचा शोध घेण्याची मागणी केली आहे. यावेळी नितीन परूळेकर, जगन्नाथ सावजी, संतोष शेलटकर, जनार्दन आजगावकर व ग्रामस्थ उपस्थित होते.