राजापूर (वार्ताहर): स्वातंत्र्यपुर्व काळात सुरू झालेले नगर वाचनालय यावर्षी १६० व्या वर्षात पर्दापण करीत असल्याने हे वर्ष शतकोत्तर हिरक महोत्सवी वर्ष साजरा करण्याचा येणार आहे. त्या अनुषंगाने वर्षभरात विविध सांस्कृतिक व समाज प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्याचा संकल्प रविवारी पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सोडण्यात आला.
राजापूर नगर वाचनालय या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी नगर वाचनालय सभागृहात संस्थेचे अध्यक्ष प्रभात पाध्ये यांच्या अध्यक्षताखाली पार पडली. यावेळी कार्यवाह जयंत अभ्यंकर यांनी याबाबतचे निवेदन केले.
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत कार्यवाह जयंत अभ्यंकर यांनी केले. त्यानंतर ग्रंथपाल सौ. पद्मजा कारेकर यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखविले. त्यावर चर्चा होवून ते कायम करण्यात आले. तर १५९ वा वार्षिक अहवाल सभेपुढे सादर करण्यात आला. वार्षिक अहवालात वर्षभरात राबविण्यात आलेले उपक्रम, भविष्यकालिन योजनेबाबतची माहिती सभासदांना देण्यात आली. त्यानंतर मागिल आर्थिक वर्षात अंदाजापेक्षा जादा झालेल्या खर्चाला मंजुरी सन २०२६-२७ सालाकरिता सादर करण्यात आलेल्या अंदाजपत्रकाला मंजूरी देण्यात आली. तर लेखापाल म्हणून सी. ए. निलेश पाटणकर यांच्या नियुक्तीला मंजूरी देण्यात आली तर सन २०२६-२७ सालाकरिता कार्यालयीन सुट्या वाचून दाखविण्यात आल्या व मंजूर करण्यात आल्या.
यावेळी कार्यवाह अभ्यंकर यांनी नगर वाचनालयाच्या वाटचालीचा आढावा घेतला. तसेच नगर वाचनालय वाचन चळवळ वृध्दींगत होण्यासाठी नगर वाचनालय करत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. वाचन चळवळ अधिक सदृढ व्हावी, जास्तीत जास्त वाचक नगर वाचनलाशी जोडले जावेत अशी अपेक्षा व्यक्त करताना त्यासाठी नागरिकांचा अपेक्षित प्रतिसाद लाभत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. जास्तीत जास्त नागरिकांनी नगर वाचनालयाशी जोडून घेवून राजापूरच्या सांस्कृतिक इतिहासाचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले.
यावेळी उपाध्यक्ष जयेश हर्डीकर, सुहास ओळकर, अतुल नवरे, राजेंद्र रानडे, सौ. श्रृती ताम्हनकर, शैलेश आंबेकर, दर्शना मांडवकर आदी कार्यकारी मंडळातील सदस्य तसेच अर्बन बँके संचालक दिनानाथ कोळवणकर, जी. आर. कुलकर्णी, सौ. दिपाली पंडीत, मिनल ओळकर, रघुवीर बापट, अनिल जायदे आदींसह कर्मचारी अनघा करंदीकर, अनिकेत नाडणकर यांसह सभासद, वाचक, कर्मचारी वृंद उपस्थित होते. आभार साईशा पडयार यांनी मानले.












