दोडामार्ग प्रतिनिधी :
माजगावचे सुपुत्र तथा दोडामार्ग तालुक्यातील कोनाळकट्टा येथील ‘एम. आर. नाईक विद्यालयाचे’ मुख्याध्यापक विश्वनाथ उर्फ उमेश वामन सावंत सुमारे ३० वर्षांच्या प्रदीर्घ आणि आदर्शवत शैक्षणिक सेवेतून मंगळवारी (३० जून) सेवानिवृत्त होत आहेत. या निवृत्तीचे औचित्य साधून मंगळवारी सकाळी १० वाजता कोनाळकट्टा हायस्कूलमध्ये त्यांच्या भव्य गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
विश्वनाथ सावंत यांनी १५ जून १९९६ रोजी कोनाळकट्टा हायस्कूलमधून आपल्या ज्ञानदानाच्या पवित्र कार्यास सुरुवात केली होती. आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी काही काळ मांगेली माध्यमिक विद्यालयातही शिक्षक म्हणून उत्तम सेवा बजावली. केवळ अध्यापनच नव्हे, तर शैक्षणिक क्षेत्रासोबतच कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातही त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. आपल्या अष्टपैलू कर्तृत्वाने त्यांनी विद्यार्थी आणि समाजमनात एक अढळ स्थान निर्माण केले आहे. अखेर नियत वयोमानानुसार ते आपल्या सेवेतून निवृत्त होत आहेत.
या आयोजित गौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ‘तिलारी खोरे शिक्षण प्रसारक मंडळाचे’ अध्यक्ष सुरेश दळवी भूषवणार असून, संस्थेचे अन्य सर्व पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत.
मुख्याध्यापक विश्वनाथ सावंत यांच्या या कृतज्ञता व गौरव सोहळ्याला शिक्षणप्रेमी, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ आणि स्नेह्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आर. एम. नाईक विद्यालय, सावंत कुटुंबिय आणि मित्रमंडळाने केले आहे.












