सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून बँकेच्या माजगाव शाखेमार्फत सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून वृक्षरोपण उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. या प्रसंगी पर्यावरणाचा संदेश देत शेतकऱ्यांना वृक्षरोपांचे वाटपही करण्यात आले.
वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात परिसरातील पाच शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात वृक्षरोपे वितरित करण्यात आली. उपस्थित शेतकऱ्यांना व नागरिकांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देत, प्रत्येकाने वृक्ष लागवड व त्याचे जतन करणे काळाची गरज असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
हा सामाजिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी माजगाव शाखेच्या शाखा व्यवस्थापक वर्षा ताटे, सरिता गावडे तसेच सुदन राणे यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला. बँकेने आपल्या वर्धापन दिनानिमित्त राबविलेल्या या पर्यावरणपूरक उपक्रमाचे माजगाव परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.













