आ. किरण सामंत यांच्या सर्व प्रशासकिय अधिकाऱ्यांना सक्त सुचना
नाटे सागरी पोलीस स्थानकाच्या कारभाराविरोधात आमसभेत तीव्र नाराजी
हातिवले टोल नाक्यावर तालुका वासीयांना टोलमाफी मिळावी असा एकमुखी ठराव मंजूर
गोवा बनावट दारू विक्रीचे तालुक्यातुन समुळ उच्चाटन करा प्रसंगी विक्री करणाऱ्यांना हद्दपार करा आ. सामंत यांच्या सुचना
राजापूर प्रतिनिधी : तालुक्यातील विविध प्रश्नांबाबत जनतेकडून प्राप्त झालेली निवेदने व आमसभेत उपस्थित झालेल्या विविध प्रश्नांबाबत सकारात्मक चर्चा करताना प्रशासकिय अधिकारी व कर्मचारी यांनी प्राप्त निवेदने व उपस्थित प्रश्नांबाबत तातडीने कार्यवाही करावी अशा सक्त सुचना आमदार किरण सामंत यांनी राजापूरच्या आमसभेत दिल्या. तर नाटे पोलीस स्थानकाच्या कारभाराविरोधात नाटे परिसरातील ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त करत गोवा बनावटीच्या दारू विरोधात नाटे पोलीस कारवाई करत नसल्याची तक्रार या आमसभेत केली. यावर नाटेच नाही तर संपुर्ण राजापूर तालुक्यातुन गोवा बनाटवटीच्या दारू विक्रीचे उच्चाटन झाले पाहिजे अशा पध्दतीने कारवाई करा अशा पोलीसांना सक्त सुचना देतानाच कार्यकारी दंडाधिकारी व उपविभागिय अधिकारी यांनी अशा खटल्यांमध्ये दहा हजाराच्या पटीत दंड करावा व जे वारंवार अशा खटल्यांमध्ये आढळून येतील त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई करा वेळ पडली तर हद्दपार करा अशा सुचनाही आ. सामंत यांनी प्रांताधिकारी यांना दिल्या.
या आमसभेत हातिवले टोल नाक्यावर राजापूर तालुका वासीयांना टोलमाफी मिळावी असा एकमुखी ठरावही आमसभेत पारित करण्यात आला. आमसभेत उपस्थितीत प्रश्नांना प्रामाणिकपणे न्याय देण्याची ग्वाही देतानाच प्रशासनाने जनतेच्या प्रश्नांबाबत गांभीर्याने काम करावे अशा सुचना यावेळी आ. सामंत यांनी दिल्या. प्राप्त निवेदनांवर त्या त्या विभागांनी पुढील आठ दिवसात निवेदनकर्त्यांना लेखी उत्तरे द्यावीत अशा सुचनाही आ. सामंत यांनी दिल्या.
राजापूर तालुका पंचायत समितीची आमसभा गुरूवारी आ. किरण सामंत यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील श्री मंगल कार्यालयात झाली. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके, सभापती नंदीनी कदम, उपसभापती अभिजीत गुरव, प्रांताधिकारी विश्वजित गाताडे, तहसीलदार विकास गंबरे, राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव, नाटेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, गटविकास अधिकारी रोहित कुंभार, डोंगरी समिती सदस्य रवींद्र नागरेकर, शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष अशफाक हाजू, तालुका प्रमुख दिपक नागले, जिल्हा बँक संचालक मंदार सप्रे आदींसह सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
या आमसभेच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील जनतेकडूनत विविध प्रश्नांबाबत निवेदने मागविण्यात आली होती. या आमसभेत तब्बल ९० पेक्षाही अधिक निवेदने प्राप्त झाली होती. या निवेदनावर प्रत्येक निवेदनानुसार सभागृहात चर्चा करत आ. सामंत यांनी ज्या ज्या निवेदनकर्त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते त्याला न्याय दिला. तर विकास कामांच्या निवेदनावर आपण नक्कीच आवश्यक ती विकास कामे प्राधान्याने पुर्ण करू अशी ग्वाही दिली. या निवेदनांमध्ये, एसटी. महावितरण, बांधकाम, आरोग्य, जलजीवन मिशन, पोलीस प्रशासनांशी निगडीत प्रश्नांचा समावेश होतो.
भाजपाचे शहर अध्यक्ष सुशांत मराठे यानी राजापूर नगर परिषदेकडून दिव्यांगाना योग्य प्रकारे योजनांचा लाभ दिला जात नाही, मुख्याधिकारी भेटत नाहीत अशी तक्रार केली. यावर शहरातील दिव्यांग बांधवांच्या प्रश्नांसाठी स्वतंत्र बैठक घेऊन कार्यवाही करू अशी ग्वाही आ. सामंत यांनी दिली. तर मुख्याधिकारी यांनी दिव्यांग बांधवांसह जनतेला भेटीसाठी वेळ निश्चित करून द्यावी व समस्यांचे निराकारण करावे अशा सुचना यावेळी आ. सामंत यांनी दिल्या.
नाटे पोलीस स्थानकातील हद्दीत गोवा बनावट दारू विक्रीसह अनेक अवैध धंदे सुरू असल्याची तक्रार यावेळी नाटे सरपंच संदीप बांदकर व ग्रामस्थांनी केली. अर्ज करून विक्रीची ठिकाणे सांगूनही नाटे पोलीस कारवाई करत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. यावर आ. सामंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गोवा बनावट दारू विक्री विरोधात कडक आणि धडक कारवाई करा, गोवा बनावट दारू विक्रीचे समुळ उच्चाटन करा अशा सक्त सुचना त्यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या.
महामार्गावरिल मोकाट गुरे, एसटी डेपोसमोर उड्डाणपुल बांधणे व महामार्गावरील अन्य कामांबाबत अरवींद लांजेकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर महामार्ग विभागाला तात्काळ कारवाई करण्याचे आदेश आ. सामंत यांनी दिले. राजापूर धोपेश्वर रस्त्यांचे रूंदीकरण करा व धोपेश्वर मंदिराकडे जाणारे फलक लावा अशी मागणी लांजेकर यांनी केली. त्यावरही कार्यवाहीच्या सुचना आ. सामंत यांनी दिल्या. तर तळगाव येथील भूषण सावंत यांच्यावर पोलीसांकडून झालेल्या अन्यायाबबातच्या तक्रारीवरही आ. सामंत यांनी योग्य ती दखल घेत पोलीस प्रशासन कार्यवाही करेल असे नमुद केले. तर केलेली कार्यवाही योग्य असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी दिली.
बारसूचे विनायक कदम यांनी गोवा बनावट दारू विक्री प्रकरणात स्थानिकांनीही पोलीसांना सहकार्य करणे गरजेचे असल्याचे नमुद केले. यावर कारवाईसाठी पोलीसांना स्वातंत्र्य दयावे अश मागणी केली. राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या कामाचे कौतुक करत महामार्गावर रात्री अपरात्री सुरू असलेले धाबे बंद करावेत, या धाब्यांवर अमली पदार्थ विक्री होत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावर कारवाईचे आदेश आ. सामंत यांनी दिले. तर आरोग्य सेवेत सुधारणा करण्याची मागणीही कदम यांनी केली. कशेळी गावातील प्रश्नांबाततही आ. सामंत यांनी कार्यवाही करण्यटाच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्या. तर तालुक्यात होत असलेल्या जगतोडीबाबतही या आमसेभत चर्चा झाली. जेवढी झाडे तोडली जातात तेवढी वृक्ष लागवड करण्याची मागणी करण्यात आली.
या आमसभेत संजय बांदकर, राजन लाड, महादेव रोडे, माधवी हर्डीकर, जितेंद्र खामकर, मनोज आडविलकर, भरत लाड, अमर जाधव, मलिक गडकरी, विजय पाध्ये, आजिम जैतापकर आदींसह उपस्थितांनी प्रश्न उपस्थित केले. यावर आ. सामंत यांनी सकारात्मक चर्चा करत निराकरण केले. या आमसभेत दिवंगताना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. तर अनेकांचे अभिनंदनाचे ठरावही पारित करण्यात आले.
प्रशासकिय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम करावे राजकारण करू नये- आ. किरण सामंत
गुरूवारी झालेल्या आमसभेत काही प्रशासकिय अधिकारी व कर्मचारी मनमानी करत आहेत, जनतेला जुमानत नाहीत अशा तक्रारी आल्या होत्या. यावर आ. सामंत यांनी प्रशासकिय अधिकारी व कर्मचारी यांनी राजकारण करू नये, राजकारणात पडू नये, तुंम्ही प्रशासकिय सेवेत आहात ते जनतेच्या कामासाठी आहात याचे भान ठेवा आणि जनतेची कामे करा शा पध्दतीने अधिकारी कर्मचाऱ्यांचे कान टोचले.
जनतेच्या सर्व निवेदने व प्रश्नांना न्याय देत आ. किरण सामंत यांनी अवघ्या तीन तासात संपवली आमसभा
तब्बल आठ वर्षांनी झालेल्या व आ. किरण सामंत यांच्या अध्यक्षतेखाली प्रथमच होणाऱ्या या आमसभेकडे साऱ्यांचेच लक्ष लागले होते. मात्र प्राप्त झालेली तब्बल ९० पेक्षाही अधिक निवेदने, उपस्थित झालेले प्रश्न यांवर सकारात्मक चर्चा करत कार्यवाहीची ग्वाही देत व जनतेचे समाधान करत आ. किरण सामंत यांनी अवघ्या तीन तासात आमसभा संपविली. यापुर्वी दिवस दिवसभर आमसभा चालत असत. मात्र आ. सामंत यांनी या पहिल्याच आमसभेत आपल्या कार्यपध्दतीची पुन्हा एकदा झलक दाखविली. गेल्या दोन वर्षात आ. सामंत यांनी राजापूर मतदार संघात केलेली विकास कामे व भविष्यातील विकासाच्या संकल्पना, सर्वसामान्य जनतेसाठी २४ तास काम करण्याची पध्दत याबाबत आमसभेत अनेक मान्यवरांनी आ. सामंत यांना धन्यवाद देत त्यांचे अभिनंदन केले. यावर मी आपले काम करण्यासाठीच आहे असे नम्रतापुर्वक सांगत भविष्यात राजापूरच्या सर्वांगिण विकासासाठी एकसंघपणे काम करूया अशी साद आ. सामंत यांनी घातली.













