‘एक विद्यार्थी – एक वृक्ष’ उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाची जनजागृती
कणकवली : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतीचे शिल्पकार स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या करण्यात येणाऱ्या ‘महाराष्ट्र कृषी दिना’चे औचित्य साधून फोंडाघाट येथील कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय, श्रीमती सुमती मराठे कृषी तंत्र निकेतन आणि कै. राजाराम मराठे उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपणाचा विशेष उपक्रम राबविण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या माध्यमातून आयोजित या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.
‘एक विद्यार्थी – एक वृक्ष’ ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. महाविद्यालय परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी केवळ वृक्षारोपण न करता वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहनही विद्यार्थ्यांना करण्यात आले.
कार्यक्रमात शाश्वत शेती, आधुनिक कृषी तंत्रज्ञान, जलसंधारण, नैसर्गिक संसाधनांचे जतन आणि पर्यावरण संरक्षण यांसारख्या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर वृक्षांचे महत्त्व आणि पर्यावरण संतुलन राखण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याची गरज यावरही भर देण्यात आला.
या प्रसंगी प्राचार्य संते, दर्शना कदम, प्रसाद खांबल, ओंकार वारंग, रुपाली ढोले, देसाई मॅडम, रजनी किल्लेदार, अस्मिता पाटील, वेदांत जोशी यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनाची शपथ घेत परिसर हिरवागार ठेवण्याचा संकल्प केला. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सहकार्याने कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली असून सामाजिक उत्तरदायित्वाची भावना अधिक दृढ करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.













