पालखी सोहळा, ढोल-ताशांचा गजर, आतषबाजी आणि रात्री दशावतारी नाट्यप्रयोगाचे आयोजन
स्वप्निल कदम l कुडाळ : श्री सातेरी महादेवादी देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव सोमवार, दिनांक ३० नोव्हेंबर २०२६ रोजी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या जत्रोत्सवासाठी गावातील ग्रामस्थ, मानकरी, सेवेकरी, चाकरमानी तसेच परगावी वास्तव्यास असलेले असंख्य भाविक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
जत्रोत्सवानिमित्त सकाळपासून श्री देवी सातेरी मंदिरात भाविकांसाठी ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ठीक ४ वाजता श्री महादेव मंदिरातून श्रींच्या पालखीचे गाव परिक्रमेसाठी प्रस्थान होणार आहे. रात्री ११ वाजता मंदिर परिसरात पालखी प्रदक्षिणा सोहळा पार पडणार आहे. यावेळी जामसंडे येथील श्री दिर्बा रामेश्वर ढोल-ताशा पथकाचा गजर आणि फटाक्यांची आकर्षक आतषबाजी हे जत्रोत्सवाचे विशेष आकर्षण असणार आहे.
त्यानंतर रात्री १ वाजता कवठी येथील बाळकृष्ण पारंपरिक लोककला दशावतार नाट्य मंडळाचा महान पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे.
या धार्मिक आणि भक्तिमय जत्रोत्सवात सर्व भाविक भक्त, ग्रामस्थ, महिला भगिनी आणि चाकरमानी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ग्रामदेवतेच्या उत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन श्री सातेरी महादेवादी देवस्थान स्थानिक सल्लागार उपकवठी यांच्या वतीने करण्यात आले आहे.













