चौके ग्रामदेवता श्री भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव 30 नोव्हेंबर रोजी 

चौके l प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील चौके गावची प्रसिद्ध पाषाणरुपी स्वयंभू ग्रामदेवता श्री भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव सोमवार दिनांक 30 नोव्हेंबर रोजी भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होणार आहे.

 

यानिमित्त जत्रोत्सवाच्या दिवशी सकाळी भराडी देवीसह इतर देवतांची विधिवत पूजा करण्यात येणार असून सकाळी 10 वाजता पालटदार मानकरी यांच्याकडून मानाची ओटी भरली जाते त्यानंतर भाविकांकडून ओट्या भरण्याचा कार्यक्रम चालू होतो . रात्री 11.00 वाजता मंदिराभोवती पारंपारिक ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत मंदिरा भोवती भव्य पालखी प्रदक्षिणा काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने चाकरमानी भाविकभक्त सहभागी होतात.

त्यानंतर परंपरागत चेंदवणकर गोरे दशावतार नाट्य मंडळाचा पौराणिक नाट्यप्रयोग सादर होणार आहे.दुसऱ्या दिवशी जागर करून तिसऱ्या दिवशी देवी आपला भाऊ आंबेरी गावचे ग्रामदैवत श्री देव जैन सकलेश्वर देवाच्या भेटीला आंबेरी येथे पालखीसह जाते त्यानंतर तेथील जत्रोत्सव झाल्यानंतर सकाळी गाडगे फोडून दोन्ही जत्रौउत्सवाची सांगता होते.

तरी या दोन्ही वार्षिक जत्रोत्सवाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान मानकरी यांच्यावतीने करण्यात आले आहे.