खरवते-दहिवली कृषि महाविद्यालयात कृषि दिन उत्साहात

चिपळूण (प्रतिनिधी) : शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालय, खरवते-दहिवली येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा कृषी क्रांतीचे जनक स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषि दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील, विभाग प्रमुख डॉ. हरिश्चंद्र भागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी त्यांच्या कृषी विकासातील अमूल्य योगदानाचा गौरव करण्यात आला. प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील यांनी आपल्या मनोगतात शेतकरी, कृषी शिक्षण आणि आधुनिक शेती यांचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी संशोधनाभिमुख दृष्टीकोन स्वीकारून शाश्वत शेतीच्या विकासासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी आधुनिक कृषी तंत्रज्ञान, नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती, जलसंधारण, पीक व्यवस्थापन आणि कृषी उद्योजकता या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही कृषी क्षेत्रातील नवकल्पना, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत शेतीबाबत आपले विचार मांडले.
कृषि दिनानिमित्त महाविद्यालय परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करून त्यांचे संवर्धन करण्याची शपथ घेतली. तसेच परिसर स्वच्छता अभियान राबवून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभाग, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा.महाबळ यांनी केले. या कृषि दिनाच्या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक शेती, कृषी संशोधन आणि शाश्वत कृषी विकासाविषयी जागरूकता निर्माण झाली असून, कृषी क्षेत्रात नावीन्यपूर्ण कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.