देवरूख (प्रतिनिधी):
संगमेश्वर तालुक्यातील देवरूख पोलीस ठाण्याच्या निरीक्षक पदाची धुरा आता नूतन पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. येथील पोलीस निरीक्षक उदय झावरे यांना पदोन्नती मिळाल्यामुळे त्यांच्या जागी यादव यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे.
देवरूख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय झावरे यांची रायगड येथे उपविभागीय पोलीस अधिकारी पदावर पदोन्नती झाली आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या या महत्त्वाच्या पदावर रत्नागिरी ग्रामीण पोलिस दलात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांची वर्णी लागली आहे. राजेंद्र यादव यांनी यापूर्वी रत्नागिरी ग्रामीण भागात उल्लेखनीय कामगिरी केली असून, त्यांच्या अनुभवाचा फायदा देवरुख परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. पदोन्नती मिळालेले उदय झावरे आणि नूतन पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.













