६ जुलै रोजी ‘नगर पंचायत’ प्रशासनाला जाब विचारणार
शिक्षण, आरोग्य आणि ‘वृक्ष करा’वरून बैठकीत संताप
वेळ पडल्यास कायदेशीर कारवाई करण्याची तयारी
देवरूख (प्रतिनिधी):
देवरूख नगरपंचायत प्रशासनाने केलेल्या अवाजवी कर वाढीविरोधात ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिक आता पूर्णपणे आक्रमक झाले आहेत. प्रशासनाने करांमध्ये थेट चौपट वाढ केल्यामुळे जनतेत तीव्र संतापाची लाट उसळली असून, या अन्यायाविरोधात येत्या ६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता सर्व ग्रामस्थ नगर परिषदेवर एकत्र येऊन प्रशासनाला थेट जाब विचारणार आहेत.
नुकतीच या संदर्भात ग्रामस्थांची एक महत्त्वाची आणि मोठी बैठक पार पडली. या बैठकीला नागरिकांनी प्रचंड संख्येने उपस्थिती लावली होती. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी शिक्षण, आरोग्य आणि अनपेक्षितपणे लावण्यात आलेल्या ‘वृक्ष करा’वरून प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली.
“सर्वसामान्यांकडून ‘वृक्ष कर’ कसला वसूल केला जातोय? आणि कोणतीही पूर्वकल्पना न देता कर थेट चौपट का वाढवला?” असा संतप्त सवाल यावेळी नागरिकांनी उपस्थित केला. या नगर पंचायतच्या हद्दीत ३० टक्के शहरी, तर तब्बल ७० टक्के ग्रामीण भागाचा समावेश आहे. असे असतानाही ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष करून केवळ करवसुलीचा तगादा लावल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. लोकशाही मार्गाने नागरिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाल्यास तो सहन केला जाणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.
या बैठकीला माजी राज्यमंत्री रवींद्र माने आणि जिल्हा परिषद सदस्य नेहा माने यांनी उपस्थित राहून नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच नगरसेवक बाळा कामेरकर आणि सुरेश बने यांनीही प्रशासनाच्या या धोरणाचा निषेध केला. या महत्त्वपूर्ण बैठकीला निधा कापडी, ऋतुजा कदम, युयुत्सु आर्ते, बंड्या बोरुकर, छोट्या गावणकर, दिलीप बोथले, प्रसाद सावंत, निखिल कोळवणकर, मनोहर गुरव, डॉ. मंगेश कांगणे, निलेश भुवड यांच्यासह परिसरातील अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. प्रशासनाच्या या मनमानी कारभाराला चाप लावण्यासाठी ६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता नगर परिषदेवर धडक देण्याचा एकमुखी निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. “आपल्या हक्कासाठी आणि अन्यायी कर वाढीविरोधात सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,” असे आवाहन आंदोलन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.












