ज्ञानदीप इंग्लिश मीडिअम स्कूल सीबीएसईच्या पाच विद्यार्थ्यांची राज्य गुणवत्ता यादीत चमक; शिष्यवृत्ती परीक्षेत शंभर टक्के यश

खेड (प्रतिनिधी) : ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड (रत्नागिरी) संचलित ज्ञानदीप इंग्लिश मीडिअम स्कूल (सीबीएसई), मोरवंडे-बोरजने शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. इयत्ता पाचवी व आठवीच्या सीबीएसई/आयसीएसई शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेच्या एकूण पाच विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. विशेष म्हणजे इयत्ता पाचवी आणि आठवी या दोन्ही वर्गांचा शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
इयत्ता पाचवीच्या राज्य गुणवत्ता यादीत कु. काव्या योगेश यादव हिने राज्यात पाचवा व रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला. कु. शर्विल हणमंत पाटील याने राज्यात १५ वा व जिल्ह्यात तिसरा क्रमांक पटकावला. कु. रुद्रा महेश कदम आणि कु. शाश्वत रवींद्र ओकटे यांनी राज्यात संयुक्त १६ वा क्रमांक मिळवत जिल्ह्यात चौथा क्रमांक प्राप्त केला. इयत्ता आठवीमध्ये कु. अमेय रामचंद्र नांदिवडेकर याने राज्यात १६ वा क्रमांक मिळवून शाळेच्या यशात भर घातली.
शाळेच्या माहितीनुसार, महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त शाळांच्या गुणवत्ता यादीनुसार इयत्ता पाचवीतील ४० पैकी २६ विद्यार्थी आणि इयत्ता आठवीतील ११ पैकी ८ विद्यार्थी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळविण्याच्या पात्रतेचे ठरले असते. त्यामुळे शाळेच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
या यशामागे विद्यार्थ्यांचा सातत्यपूर्ण अभ्यास, प्रश्नपत्रिका सोडविण्याचा नियमित सराव, चुकांचे विश्लेषण तसेच शिक्षक, पालक आणि संस्थेचे सहकार्य महत्त्वाचे ठरल्याचे शाळेने सांगितले. विद्यार्थ्यांना प्राचार्य भरत मोरे, प्रतीक पवार, शर्वरी शिर्के, स्नेहलता खोपडे, मंदार भोसले, करण दिगंबरे, प्रियसी दळवी, अक्षय महाजन, प्राजक्ता दळवी, सुनंदा ठोंबरे, प्रलय शिंदे तसेच पुणे येथील तज्ज्ञ मार्गदर्शक श्रीरंग बापट यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल संस्थाध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष रमणलाल तलाठी, संस्थेचे सरचिटणीस व ज्ञानदीप इंग्लिश मीडिअम स्कूल प्रशाला समितीचे चेअरमन माधव पेठे, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराथी, जनसंपर्क अधिकारी दीपक लढ्ढा तसेच संस्थेचे पदाधिकारी, सभासद आणि विविध आस्थापनांचे प्राचार्य व मुख्याध्यापक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे, पालकांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.