Home रत्नागिरी खेड घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयात एमसीए व एमएमएस विभागाचा विद्यार्थी स्वागत समारंभ उत्साहात पार

घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयात एमसीए व एमएमएस विभागाचा विद्यार्थी स्वागत समारंभ उत्साहात पार

खेड (प्रतिनिधी): घरडा फाऊंडेशन संचालित घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयात दिनांक २८ सप्टेंबर २०२५ रोजी एमसीए व एमएमएस अभ्यासक्रमाच्या नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वागत समारंभाचे आयोजन उत्साहात करण्यात आले. या समारंभाद्वारे विद्यार्थ्यांचे महाविद्यालयीन वातावरणाशी अधिक दृढ नाते जुळावे आणि त्यांच्या शैक्षणिक तसेच वैयक्तिक विकासाला दिशा मिळावी हा प्रमुख उद्देश होता.
या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करताना घरडा संस्थेची शैक्षणिक परंपरा, पद्मश्री डॉ. घरडा यांचे कार्य आणि संशोधनाभिमुख दृष्टीकोन यावर प्रकाश टाकला. त्यांनी शिक्षक-विद्यार्थी संबंध आणि सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाची भूमिका अधोरेखित केली.
यानंतर एमसीए विभागप्रमुख डॉ. पूनम शित्याळकर यांनी संगणक क्षेत्रातील करिअरच्या विविध संधींचा आढावा घेत विद्यार्थ्यांना कौशल्यविकास आणि तांत्रिक प्रगतीसोबत अद्ययावत राहण्याचे महत्त्व पटवून दिले. त्याचप्रमाणे एमएमएस विभागप्रमुख प्रा. पी. आर. तांबे यांनी व्यवस्थापन शिक्षणातील नव्या प्रवाहांची माहिती देत नेतृत्वगुण, संवादकौशल्य आणि उद्योगजगताशी सुसंगत राहण्याची क्षमता विद्यार्थ्यांनी विकसित करावी, असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमात सहाय्यक प्राध्यापक सौ. सायली घाडगे, प्रा. मंगेश ठसाळे, प्रा. करिश्मा कवळे आणि प्रा. श्रृंगी तेली यांनी अभ्यासक्रमाची रचना, विद्यापीठीनियम, परीक्षा पद्धती आणि महाविद्यालयीन उपक्रमांविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यासोबतच सांस्कृतिक, क्रीडा व सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
या समारंभाची सांगता राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते व वातावरणात उत्साह आणि नव्या शैक्षणिक प्रवासाबद्दलची ऊर्जा जाणवत होती.
error: Content is protected !!