चिपळूणमध्ये एनडीआरएफचे पथक दाखल

संभाव्य पूर येणाऱ्या भागाची केली पाहणी

चिपळूण (प्रतिनिधी):– आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची ( एनडी आरएफ) ची तुकडी शुक्रवारी सायंकाळी उशिरा चिपळूणमध्ये दाखल झाली आहे. प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे, चिपळूण नगर परिषदेचे उपमुख्य अधिकारी मंगेश पेढांबकर यांच्यासह या पथकाने चिपळूण शहरातील संभाव्य पूर येणाऱ्या भागाची पाहणी केली.

चिपळूण शहरासह ग्रामीण भागाला दिनांक २६ जुलै २००५ व २१ जुलै २०२१ रोजी अतिवृष्टीचा फटका बसला होता. चिपळूण शहरासह ग्रामीण भागात हाहाकार उडाला होते. चिपळूणवासी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या पूरमय परिस्थिती दरम्यान राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाला पोहोचण्यात अडथळे निर्माण झाल्याने पथक उशिरा पोहोचले होते. तरीही चिपळूण पोहोचल्यानंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने आपली कामगिरी चोख बजावली होती. याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी गेल्या वर्षांपासून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची तुकडी जुलै महिन्यातच चिपळूण मध्ये दाखल होत आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल ( एनडी आरएफ) ची तुकडी शुक्रवारी सायंकाळी चिपळूणमध्ये दाखल झाली आहे. या पथकात ३ अधिकारी, २३ जवान तीन चालक यांचा समावेश आहे. या पथकाने प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे, चिपळूण नगर परिषदेचे उप मुख्य अधिकारी मंगेश पेढांबकर यांच्यासह अधिकाऱ्यांसमवेत संभाव्य पूर येणाऱ्या भागाची पाहणी केली. सदरील पथक पावसाळा संपेपर्यंत चिपळुनात थांबणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.