सात दुचाकींचे नुकसान – वारंवार दिलेल्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप
चिपळूण (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईसह अन्य शहरात झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडत आहेत. या घटना ताज्या असतानाच चिपळूण पंचायत समितीच्या प्रवेशद्वाराजवळील महाकाय वृक्ष अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत प्रवेशद्वाराजवळ उभ्या असलेल्या सात दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने त्या वेळी वृक्षाखाली कोणी नसल्याने मोठी जीवितहानी टळली.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर धरला असून परशुराम घाटात गॅबियन वॊलच्या पायथ्याची माती निघून गेल्याने गॅबियन वोलला धोका निर्माण झाल्याचे समोर येत आहे. तर कुंभार्ली घाटात रस्त्याची साईड पट्टी खचल्याचे देखील समोर आले आहे तर दुसरीकडे मुंबईसह अन्य शहरात झाडे उन्मळून पडल्याने दुर्घटना घडत आहेत. तर शुक्रवारी चिपळूण पंचायत समितीसमोरील महाकाय वृक्ष उन्मळून पडला आहे. या घटनेत दिवसातील चे नुकसान झाल्याचे समोर आले असून सुदैवाने कोणतीही जीवित हानी घडलेली नाही.
या घटनेनंतर स्थानिकांकडून करण्यात आलेल्या आरोपानुसार, या महाकाय वृक्षाच्या बुंध्याजवळ पंचायत समितीतील काही कर्मचाऱ्यांकडून वारंवार कचरा जाळला जात होता. त्यामुळे वृक्षाचा बुंधा आतून जळून कमकुवत झाला होता आणि हा वृक्ष धोकादायक बनल्याची चर्चा परिसरात होती.
तसेच, डॉ. अशोक सकपाळ यांनी हा वृक्ष धोकादायक असल्याने तो तातडीने तोडण्यात यावा, अशी लेखी मागणी गटविकास अधिकाऱ्यांकडे (बीडीओ) केल्याचा दावा केला आहे. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
आज अखेर तोच वृक्ष कोसळून सात दुचाकींचे नुकसान झाल्याने, ही दुर्घटना टाळता आली असती का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. या प्रकरणात जबाबदारी निश्चित करून चौकशी करावी आणि निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.













