राजापुरात मुसळधार, अर्जुना आणि कोदवली नद्यांच्या पाण्याच्या प्रवाहात वाढ

नागरिक व व्यापारी सतर्क
ग्रामीण भागातही पावसामुळे पडझडीच्या घटना
राजापूर प्रतिनिधी: राजापुरात शुक्रवारी रात्रीपासूनच पावसाने जोर धरला आहे. शनिवारी दिवसभर राजापूर तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने अर्जुना आणि कोदवली नद्यांच्या पाण्याच्या प्रवाहात वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकिनाऱ्यालगतचे व्यापारी व नागरिक सतर्क झाले आहेत. ग्रामीण भागातही पावसाचा जोर कायम असून काही ठिकाणी किरकोळ पडझडीच्या घटना घडल्या आहेत. तालुक्यात शुक्रवारी सरासरी आजची सरासरी 92.37 मी.मी
 पावसाची नोंद झाली आहे. तर तालुक्यातील एकूण आठ पर्जन्य मापन मंडळांमध्ये एकूण 739 मिलीमिटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
गेले दोन दिवस मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे शुक्रवारी तालुक्यातील ओणी पाचल अणूस्कुरा मार्गावर झाड कोसळुन वाहतुक काही काळ ठप्प झाली होती. मात्र सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या वतीने तात्काळ झाड बाजुला करून वाहतुक पुर्ववत सुरू करण्यात आली आहे. ग्रामीण भागातही पावसाचा जोर वाढल्याने नदीनाल्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. या पावसामुळे शहरासह ग्रामीण भागात काही ठिकाणी विजपुरवठा खंडीत झाला आहे. तर काही भागात वारंवार विजपुरवठा खंडीत होत आहे. महावितरणकडून तातडीने खंडीत विजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कार्यवाही केली जात आहे.
 राजापुर तालुक्यात मंडळ निहाय पडलेला पाऊस यामध्ये राजापूर मंडळात सर्वाधिक -126 मि.मी,.ओणी मंडळ 83 मि. मी., कुंभवडे मंडळ -52 मि.मी., नाटे मंडळ -105,मि.मी.,जैतापूर मंडळ-109 मि.मी.,  कोंडये त. सौंदळ -100 मि.मी., पाचल मंडळ-78 मि.मी.,   सौंदळ मंडळ-86 मी.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात या आठ मंडळात मिळून एकूण 739 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली असून शुक्रवारी सरासरी  तालुक्यात 92.37 मी.मी. इतका पाऊस झाला आहे. तर  १ जून पासून तालुक्यात  एकूण सरासरी 824.37 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
पावसाचा जोर वाढल्याने प्रशासन सतर्क –तहसीलदार विकास गंबरे
राजापूर तालुक्यात गेले चार ते पाच दिवस पावसाचा जोर वाढलेला आहे. तालुक्यात सरासरी गेल्या चार ते पाच दिवसात १०० मिलीमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झालेली आहे. यापुर्वी ग्रामीण भागात काही पडझडीच्या घटना घडल्या आहेत त्याचे पंचनामे प्रशासनाने केले आहेत. शुक्रवारी पासून संततधार व मुसळधार पडणाऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अधिक सतर्क झाल्याची माहिती राजापूर तहसीलदार विकास गंबरे यांनी दिली. राजापूर शहरातील अर्जुना व कोदवली नद्यांच्या पाण्याच्या प्रवाहात वाढ झाली असून नगर परिषद प्रशासनही सतर्क असून व्यापारी व नागरिकांनाही सतर्कतेच्या सुचना देण्यात आल्याचे गंबरे यांनी सांगितले. तालुक्यात एसटी वाहतुक सुरळीत सुरू असून घाटांतील वाहतुकही सुरळीत असल्याचे त्यांनी सांगितले. संततधार पडणाऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्वच विभागांना सतर्क रहाण्याच्या सुचना देण्यात आल्याचे गंबरे यांनी सांगितले.
नगर परिषद प्रशासनही अलर्ट मोडवर
राजापुरात शुक्रवारी संततधार पडणाऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर नगर परिषद प्रशासनही अलर्ट मोडवर आहे. नगराध्यक्षा एड. हुस्नबानू खलिफे, मुख्याधिकारी अभिजित कुंभार यांनी शनिवारी सकाळी ताताडीने बैठक घेत प्रशासनाला सतर्क रहाण्याच्या सुचना दिल्या आहेत. शहरातील अर्जुना व कोदवली नद्यांच्या पाण्याच्या प्रवाहात वाढ  होत असल्याने नदीकिनाऱ्यालगत असणारे व्यापारी व नागरिकांना सतर्क करण्यात आले आहे. पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याचे लक्षात घेऊन मुख्याधिकारी अभिजित कुंभार यांनी शहरात शनिवारी प्रत्यक्ष पहाणी केली. याप्रसंगी काँग्रेस गटनेते एड. जमिर खलिफे, कार्यालय अधिक्षक जितेंद जाधव उपस्थित होते. तर नगरसेविका सुयोगा जठार, साजिया काझी यांसह अन्य नगरसेवकांनीही शहरात नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होताच विविध भागात पहाणी केली. तर बांधकाम, आरोग्य विभागालाही सतर्क रहाण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. विजवाहिनीवरील काही झाडे महावितरणकडून तोडण्यात आली असून त्या त्या भागात नगरसेवक व नगर परिषद कर्मचारी यांच्याकडून महावितरणला सहकार्य करण्यात आले आहे.