वेंगुर्ले येथे उद्या ३० नोव्हेंबर पासून “६५ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा”..

१० डिसेंबरपर्यंत रंगणार ११ नाट्यप्रयोग ; नाट्यरसिकांसाठी पर्वणी..

 

वेंगुर्ले : दाजी नाईक

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा २०२६-२७ ची प्राथमिक फेरी वेंगुर्ला येथे आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे माझा वेंगुर्ला ने नियोजन केले असून सोमवार, ३० नोव्हेंबर ते गुरुवार, १० डिसेंबर २०२६ या कालावधीत विविध नाट्यप्रयोगांचे सादरीकरण होणार असून, यामुळे वेंगुर्ल्यातील नाट्यरसिकांना दर्जेदार नाटकांची मेजवानी अनुभवता येणार आहे. वेंगुर्ले कॅम्प येथील नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहात हे नाट्यप्रयोग दररोज सायंकाळी ७ वाजता सुरू होणार आहेत.

नाट्यप्रयोगांच्या वेळापत्रकानुसार सोमवार ३० नोव्हेंबर रोजी वेताळ प्रतिष्ठान तुळस यांचे नाटक ‘अर्धी मस्ती अर्धा ढोंग’ – लेखक दत्तात्रय ऊर्फ आबा पेडणेकर, दिग्दर्शक राजेश गोवेकर. मंगळवार १ डिसेंबर रोजी श्री तारादेवी केळुस सेवा समिती मुंबई यांचे नाटक ‘हुकुमी एक्का’ – लेखक सुहास भोळे, दिग्दर्शक प्रवीण होडावडेकर. बुधवार २ डिसेंबर रोजी श्री ओंकार पारंपरिक नाट्य मंडळ म्हापण यांचे नाटक ‘पट्टी’ – लेखक व दिग्दर्शक साईनाथ नेरकर. गुरुवार ३ डिसेंबर रोजी जीवनदायी विकास संस्था वेंगुर्ला यांचे नाटक ‘ड्रेस ऑफ द एपरर’ – लेखक रामचंद्र कुलकर्णी, दिग्दर्शक रमेश नार्वेकर. शुक्रवार ४ डिसेंबर रोजी परुळे युवक कला क्रीडा मंडळ यांचे नाटक ‘ऐसे काही व्हावे’ – लेखक व दिग्दर्शक प्रथमेश नाईक.

शनिवार ५ डिसेंबर रोजी कलावलय संस्थेचे नाटक ‘केस नंबर ९९’ – लेखक योगेश सोमण, दिग्दर्शक सुरेंद्र ऊर्फ बाळू खामकर रविवार ६ डिसेंबर रोजी सातारा मंच यांचे नाटक ‘शबय’ – लेखक विजय चव्हाण, दिग्दर्शक रामचंद्र कवठणकर. सोमवार ७ डिसेंबर रोजी जबरदस्त सांस्कृतिक मंडळ राऊळवाडा वेंगुर्ला यांचे नाटक ‘हणम्याची मरीआई’ – लेखक विजय खानविलकर दिग्दर्शक सिद्धेश सावंत. मंगळवार ८ डिसेंबर रोजी इंद्रधनु कला मंच दाभोली यांचे नाटक ‘चाकर’ – लेखक ऋषी देसाई, दिग्दर्शक संजय नागडे. बुधवार ९ डिसेंबर रोजी आनंदयात्री वांग्मय मंडळ यांचे नाटक ‘प्लॅटफॉर्म नंबर शून्य’ – लेखक व दिग्दर्शक प्रसाद खानविलकर आणि गुरुवार १० डिसेंबर रोजी अक्षरसिंधू साहित्य कला मंच कणकवली यांचे स्पर्धेतील शेवटचे नाटक ‘ध्ययकालो’ – लेखक विजय चव्हाण, दिग्दर्शक सुहास वरूणकर हे नाटक सादर होईल.

या स्पर्धेचे निमंत्रक प्रशांत खेडेकर असून, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रवेशासाठी तिकीट दर फक्त १५ रुपये व १० रुपये असे आहेत. तरी नाट्यप्रेमींनी या स्पर्धेतील सर्व नाट्यप्रयोगांना उपस्थित राहून कलाकारांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.