भूसंपादनासाठी आमदार निधी देणार; वर्षभरात ५ स्टार हॉटेलची मुहूर्तमेढ: रत्नागिरीत सामंजस्य करार संपन्न
भारतीय तटरक्षक दल व महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांच्यात झाला ‘सामंजस्य करार’
रत्नागिरी प्रतिनिधी:
“रत्नागिरीच्या विकासासाठी आजचा दिवस स्वप्नवत असून, विमानतळ म्हणजे केवळ घोषणाच आहे का? असा प्रश्न विचारणाऱ्यांच्या शंका आता पूर्णपणे दूर झाल्या आहेत. येत्या अवघ्या तीन महिन्यांत रत्नागिरी विमानतळावरून विमानाचे पहिले उड्डाण होईल,” अशी महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक घोषणा आज येथे करण्यात आली. रत्नागिरी विमानतळ आणि विकासकामांच्या सामंजस्य करार प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी बोलताना त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “महाराष्ट्र शासनासह केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या एका फोनवर या विमानतळाचे काम मार्गी लागले असून मी त्यांचे आभार मानतो. तसेच एमएडीसीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे आणि पोलीस अधीक्षक नितीन बगाटे हे सर्व अधिकारी अत्यंत सकारात्मकतेने काम करत असल्यामुळेच हे स्वप्न इतक्या लवकर सत्यात उतरत आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले. विमानतळाच्या भूसंपादनासाठी कोणतीही अडचण येऊ नये, म्हणून आमदार निधीतून आवश्यक तो निधी दिला जाईल, अशी महत्त्वाची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
अजित पवारांच्या आठवणींना उजाळा
याप्रसंगी बोलताना त्यांनी माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. “अजित पवार यांनी जेव्हा रत्नागिरीतील ‘एअर स्ट्रिप’ पाहिली होती, तेव्हा त्यांनी त्याचे कौतुक केले होते. अशीच एअर स्ट्रिप बारामतीमध्येही असावी, अशी त्यांची इच्छा होती,” अशी आठवण त्यांनी सांगितली.
५ स्टार हॉटेल, ॲडव्हेंचर पार्क आणि महिला बचत गटांना संधी
रत्नागिरीच्या पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळत असल्याचे सांगत त्यांनी आगामी प्रकल्पांची माहिती दिली. येत्या वर्षभरात रत्नागिरीत ‘५ स्टार हॉटेल’ची मुहूर्तमेढ रोवली जाईल, तसेच पर्यटकांच्या आकर्षणासाठी ‘झाडावरचे रेस्टॉरंट’ (Tree House Restaurant) आणि ‘ॲडव्हेंचर पार्क’ उभारले जाणार आहे. रत्नागिरीला ‘स्मार्ट सिटी’ बनवण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, स्थानिक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात यासाठी विमानतळावर स्थानिक महिला बचत गटांना स्टॉल दिले जातील, जेणेकरून त्यांना रोजगाराची मोठी संधी मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.
“पण विकासाला विरोध नको!”
रत्नागिरीचा कायापालट करणाऱ्या या सर्व प्रकल्पांना सर्वांनी एकत्र येऊन साथ देण्याचे आवाहन करत, “जिल्ह्याचा विकास वेगाने होत असताना यामध्ये कोणीही राजकारण किंवा विरोध करू नये,” असा स्पष्ट इशाराही त्यांनी शेवटी दिला.












