मुंबईतील उद्योजकाला ड्रायव्हरकडून ब्लॅकमेल; 20 लाखांच्या खंडणीची मागणी, आरोपी फरार

ड्रायव्हरने चार वर्षे गुपचूप फोटो आणि व्हिडिओ केले रेकॉर्ड
20 लाखांची खंडणी मागत पत्नीला सर्व पुरावे पाठविण्याची धमकी

मुंबईतील एका उद्योजकाला त्याच्याच विश्वासू ड्रायव्हरने ब्लॅकमेल करून 20 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ड्रायव्हरने गेल्या चार वर्षांत उद्योजकाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ गुपचूप रेकॉर्ड केल्याचा आरोप आहे. हे सर्व पुरावे पत्नीला पाठविण्याची धमकी देत त्याने पैशांची मागणी केली. उद्योजकाने सुरुवातीला काही रक्कम दिल्यानंतर अखेर पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणातील आरोपी सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.


मुंबई : मुंबईतील गोरेगाव परिसरात एका 38 वर्षीय उद्योजकाला त्याच्याकडे काम करणाऱ्या 35 वर्षीय ड्रायव्हरने ब्लॅकमेल करून 20 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे व्यावसायिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, संबंधित ड्रायव्हर गेल्या चार वर्षांपासून उद्योजकाकडे काम करत होता. व्यावसायिक बैठका, क्लायंट भेटी तसेच विविध ठिकाणी जाण्या-येण्याच्या वेळी तो उद्योजकासोबत असायचा. या काळात उद्योजकाच्या विविध क्लायंट्ससोबतच्या भेटी, त्यामध्ये काही महिला क्लायंट्स देखील असताना, त्याने परवानगीशिवाय गुपचूप फोटो आणि व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून ठेवले.

यानंतर संबंधित ड्रायव्हरने उद्योजकाला संपर्क करून 20 लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास आपल्या ताब्यातील फोटो आणि व्हिडिओ उद्योजकाच्या पत्नीला पाठवून देण्याची धमकीही त्याने दिली. या दबावामुळे उद्योजकाने सुरुवातीला त्याच्याशी चर्चा केली आणि काही रक्कम देण्यास तयारी दर्शवली.

त्यानंतर आरोपीला 25 हजार रुपये देण्यात आले. मात्र, पुढे कोणताही धोका पत्करू नये म्हणून संबंधित उद्योजकाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रार मिळाल्यानंतर पोलीस तातडीने तपासाला लागले असून आरोपीविरुद्ध आवश्यक गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सध्या संबंधित ड्रायव्हर फरार असून आरे पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणातील सर्व बाबींची सखोल चौकशी सुरू असून पुढील तपास प्रहार डिजिटलच्या माहितीनुसार सुरू आहे.