शिवतर रोडवरील पुराच्या पाण्यात कार वाहून गेली; तिघांचा थरारक बचाव

खेड प्रतिनिधी –
खेड तालुक्यात रविवारी (५ जुलै) झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. शिवतर रोडवरही पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने वाहतुकीस धोका निर्माण झाला होता. अशाच परिस्थितीत सैनिक स्कूल, जामगे येथून बाहेर पडणारी एक लाल रंगाची कार पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची थरारक घटना घडली.
दुपारी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास कारमध्ये एक महिला व दोन पुरुष असे तिघे प्रवास करत होते. गेटवरील सुरक्षारक्षकाने पुढे पुराचे पाणी असल्याने जाऊ नका, असा इशारा दिला होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून चालकाने कार पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पाण्याचा वेग प्रचंड असल्याने कार क्षणात पुराच्या प्रवाहात वाहून गेली आणि पुलावरील रेलिंगला अडकली.
यानंतर कारमधील तिघांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा वेग वाढल्याने ते तिघेही पुराच्या प्रवाहात वाहून गेले. ही घटना पाहून परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने नदीकाठी जमा झाले. सुदैवाने पुराच्या प्रवाहात वाहून गेलेले तिघेही जवळील झाडाला अडकले. त्यानंतर ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेत जीवाची पर्वा न करता बचावकार्य केले आणि तिघांनाही सुखरूप बाहेर काढले.
या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नदी, नाले आणि पुलांवरील पुराच्या पाण्यातून वाहन चालवू नये तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन स्थानिकांकडून करण्यात येत आहे.