कुडाळ :
कोरोना काळात जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून फटाके लावल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील सर्व आरोपींची कुडाळ येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
कोरोना महामारीच्या काळात जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिंधुदुर्ग यांनी १२ ऑगस्ट २०२१ रोजी जमावबंदीचे आदेश लागू केले होते. त्यानंतर २४ ऑगस्ट २०२१ रोजी तत्कालीन केंद्रीय मंत्री तथा भाजप नेते नारायण राणे यांना रत्नागिरी येथे पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करण्यासाठी कुडाळ येथील भाजप कार्यालयापासून फटाक्यांची आतषबाजी केल्याचा आरोप होता.
या प्रकरणी विनायक राणे, सुनील बांदेकर, आबा उर्फ अनंत धडाम , रोकेश कोंदे , रोकेश नेमळेकर, नागेश नेमळेकर, चंदन कांबळी, श्रीपाद उर्फ पप्पा तवटे, स्वरूप वालावलकर, राजवीर पाटील, सागर वालावलकर, दिपलक्ष्मी पडते, संध्या तेरसे यांच्यासह अन्य ९ ते १० भाजप कार्यकर्त्यांविरुद्ध जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीर जमाव जमवणे, फटाके लावून लोकांच्या जीवितास धोका निर्माण करणे आदी आरोपांखाली भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांसह महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणात पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे तीन साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. मात्र, साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती, घटना रात्री घडल्याने प्रत्यक्षदर्शी पुराव्याचा अभाव आणि आरोप सिद्ध करणारा ठोस पुरावा सादर करण्यात सरकार पक्षाला अपयश आल्याने न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले.
या खटल्यात आरोपींच्या वतीने अॅड. गौरव पडते, अॅड. स्वप्नाली गावडे, अॅड. अपर्णा सामंत, अॅड. ओंकार सावंत, निरंजन रावराणे आणि अॅड. द्रौपदी धुरी यांनी कामकाज पाहिले.













