अखेर आशा मावळल्या; दहिवली भूस्खलनात बेपत्ता दोघांचे मृतदेह सापडले

चार घरे बाधित; ३० एनडीआरएफ जवानांसह पोलीस, ग्रामस्थांची 21 तास चालली शोधमोहीम
पोकलेनही चिखलात रुतले
पालकमंत्री उदय सामंत व महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्यासह जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकही  घटनास्थळी

राकेश कोळी | खेड :

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यातील दहिवली ग्रामपंचायत हद्दीतील शेलारवाडी (गुडूपवाडी) येथे सोमवारी सायंकाळी भीषण भूस्खलनाची दुर्घटना घडली. डोंगराचा मोठा भाग अचानक कोसळून चार घरे बाधित झाली, तर एका घरावर दरड कोसळल्याने घरातील तिघेजण ढिगाऱ्याखाली अडकले. या दुर्घटनेत ७५ वर्षीय कल्पना शेलार यांना ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यांच्यावर प्रथम कळबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी डेरवण येथे हलविण्यात आले. मात्र ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ८५ वर्षीय शांताराम बाळा शेलार आणि ३५ वर्षीय सतीश शेलार यांचा मंगळवारी दिवसभर शोध सुरू राहिला. अखेर मंगळवारी सायंकाळी बचाव पथकाला दोघांचेही मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश आले.

या दुर्घटनेत विजय शेलार यांची उपस्थिती अत्यंत महत्त्वाची ठरली. विजय शेलार हे सोमवारी सकाळी मुंबईहून आपल्या मूळ गावी दहिवली येथे आले होते. तालुक्यातील तळे येथे एका कार्यक्रमासाठी आलेल्या विजय शेलार हे सोमवारी सायंकाळी आपल्या आई-वडिलांसोबत घराच्या अंगणात बसले असताना अचानक डोंगराचा मोठा भाग कोसळला. दरड कोसळताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता गावकऱ्यांना माहिती दिली. त्यांच्या तत्परतेमुळे काही मिनिटांतच ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू झाले. अन्यथा ही दुर्घटना रात्री उशिरापर्यंत कोणाच्याही लक्षात आली नसती, अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये होती.

या घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी, तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस, अग्निशमन दल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग तसेच एनडीआरएफचे ३० जवान घटनास्थळी दाखल झाले. मुसळधार पाऊस, डोंगरावरून सतत कोसळणारी माती, चिखल आणि अंधारामुळे बचावकार्य अत्यंत आव्हानात्मक ठरले. सुरुवातीला स्थानिक प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने मलबा हटविण्याचा प्रयत्न केला; मात्र कमकुवत जमिनीमुळे जेसीबीला माघारी फिरावे लागले. त्यानंतर पोकलेन मशीन मागविण्यात आले. मात्र तेही मातीच्या मोठ्या ढिगाऱ्यात रुतून बसल्याने यंत्रसामग्रीचा वापर थांबवावा लागला.

यामुळे एनडीआरएफ, पोलीस, महसूल विभाग आणि स्थानिक ग्रामस्थांना अनेक तास हातानेच मलबा हटवून शोधमोहीम राबवावी लागली. दुर्घटनास्थळ डोंगराच्या उतारावर असल्याने तेथे पोहोचण्यासाठी अरुंद रस्ता, सातत्याने कोसळणारा पाऊस आणि दरड कोसळण्याचा कायम धोका यामुळे बचावकार्याला मोठा विलंब झाला. प्रतिकूल परिस्थितीतही बचाव पथकाने रात्रभर प्रयत्न सुरू ठेवले आणि अखेर मंगळवारी सायंकाळी दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळाले.
घटनेची माहिती मिळताच राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी मंगळवारी पहाटेच घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी अधिकाऱ्यांना धोकादायक भागातील नागरिकांचे तातडीने स्थलांतर करण्याचे आदेश दिले.

महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनीही घटनास्थळी भेट देऊन जिल्हाधिकारी मनुज जिंदल, एनडीआरएफ अधिकारी आणि प्रशासनाकडून बचावकार्याची माहिती घेतली. त्यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. प्रतिकूल परिस्थितीतही सर्व यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत असून बाधितांना शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच दरडप्रवण गावांच्या पुनर्वसनासाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान, राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. अफवांवर विश्वास न ठेवता धोकादायक भागातील नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे तसेच आपत्कालीन परिस्थितीत राज्य नियंत्रण कक्ष १०७० आणि जिल्हा नियंत्रण कक्ष १०७७ या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

घटनास्थळी भाजपचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनीही भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. मदत ग्रुप खेड आणि भाजप कार्यकर्त्यांसह त्यांनी बचावकार्याला सहकार्य करत मलबा हटविणे, स्थानिकांना मदत करणे आणि प्रशासनाशी समन्वय साधण्याचे काम केले.

दहिवलीतील या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण रत्नागिरी जिल्हा शोकाकुल झाला असून सलग पावसामुळे दरडप्रवण भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.