न्हावेली तीन दिवसांपासून अंधारात; जाब विचारणाऱ्या लोकप्रतिनिधींना सावंतवाडी विद्युत अधिकारीची उद्धट आणि अरेरावीची भाषा!

न्हावेली प्रतिनिधी
न्हावेली गावात गेल्या तीन दिवसांपासून वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झाल्याने ग्रामस्थ तीव्र अंधाराचा सामना करत आहेत. या गंभीर समस्येबाबत जाब विचारण्यासाठी गेलेले न्हावेलीचे सरपंच तथा विद्यमान सदस्य अक्षय पार्सेकर यांना महावितरणच्या सावंतवाडी येथील विदयुत अधिकार अत्यंत उद्धट आणि अरेरावीची भाषा वापरल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

न्हावेली गावाची वीज समस्या कायमची सुटावी म्हणून लोकप्रतिनिधी अक्षय पार्सेकर यांनी गेल्या दोन वर्षांपासून गावासाठी स्वतंत्र वायरमनची मागणी लावून धरली आहे. “दोन वर्षांपासून केलेल्या मागणीचे काय झाले?” असा थेट सवाल पार्सेकर यांनी विचारला असता, विदयुत अधिकारी यांनी “न्हावेली गावाला वायरमन देत नाही आणि देणारही नाही!” अशी बेजबाबदार आणि उद्धट भाषा वापरली. महावितरणच्या या हुकूमशाही वृत्तीमुळे न्हावेली ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप उसळला आहे.

यावेळी महावितरणच्या अंतर्गत कारभाराचे वाभाडे काढताना अक्षय पार्सेकर यांनी गंभीर आरोप केले. महावितरण स्थानिक गरीब तरुणांना कंत्राटी तत्त्वावर (Contract Base) कामावर घेते. या स्थानिक कामगारांकडून सलग १८-१८ तास रात्रंदिवस राबवून घेतले जाते. जीवाचा धोका पत्करून हे कंत्राटी कामगार काम करत असताना, मुख्य अधिकारी मात्र स्वतः ‘सुशेगात’ (आरामात) एसी केबिनमध्ये बसून राहतात. कामगारांच्या घामाची आणि कष्टाची या अधिकाऱ्यांना जराही चाड नाही, असे पार्सेकर यांनी म्हटले आहे.

“स्वतः सुशेगात राहून स्थानिक कंत्राटी कामगारांची पिळवणूक करणाऱ्या आणि जनतेला अंधारात ठेवून उद्धट भाषा वापरणाऱ्या विद्युत वितरण कंपनीला (महावितरण) आता सोडणार नाही,” असा आक्रमक इशारा अक्षय पार्सेकर यांनी दिला आहे. अन्यायग्रस्त कामगारांच्या बाजूने आणि न्हावेलीच्या हक्कासाठी हा लढा अधिक तीव्र केला जाईल, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. जनतेशी आणि लोकप्रतिनिधींशी अशी अरेरावी करणारे अधिकारी सावंतवाडीत नकोत, अशी संतप्त भावना व्यक्त होत असून वेळ पडल्यास या गंभीर प्रकाराबाबत थेट स्थानिक आमदार, पालकमंत्री आणि राज्याच्या ऊर्जा मंत्र्यांची भेट घेऊन तक्रार करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तीन दिवस अंधारात काढणाऱ्या न्हावेली गावाला त्वरित न्याय न मिळाल्यास महावितरणला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा आता ग्रामस्थांमधून दिला जात आहे.