सावर्डेतील सिनियर महाविद्यालयात एक दिवसीय ‘ब्युटी पार्लर प्रशिक्षण’ कार्यशाळा
चिपळूण (प्रतिनिधी) : बदलती जीवनशैली, वाढते सौंदर्यभान आणि कौशल्याधारित रोजगाराच्या वाढत्या संधींमुळे ‘ब्युटी अँड वेलनेस’ क्षेत्र आज वेगाने विस्तारत असून स्वयंरोजगार, आर्थिक स्वावलंबन आणि उद्योजकता घडविण्यासाठी या क्षेत्राची निवड ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन प्राची बोंडकर यांनी केले. सावर्डे येथील कला व विज्ञान महाविद्यालयात आयोजित ‘महिला विकास कक्ष’ मेरा युवा भारत रत्नागिरी,युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय,भारत सरकार व लायन्स क्लब सावर्डे, आयडीयल द्वारा आयोजित डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंती निमित्ताने कौशल्य विकास या उपक्रमांतर्गत एकदिवसीय ‘ब्युटी पार्लर प्रशिक्षण’ कार्यशाळेप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी प्राचार्य टी.वाय.कांबळे यांनी प्रमुख मार्गदर्शिका मा.प्राची बोंडकर यांचे स्वागत केले. तसेच उपस्थित डॉ.दर्शन खोत (खजिनदार-लायन्स क्लब सावर्डे,आयडियल) अनिकेत जाधव (तालुका प्रतिनिधी-मेरा युवा भारत रत्नागिरी) डॉ.वर्षा खानविलकर (सदस्या -लायन्स क्लब सावर्डे,आयडियल) कु.वेदांत गुरव कु.रंम्भीर पवार (स्वयंसेवक-मेरा युवा भारत) यांचेही महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करण्यात आले. या कार्यशाळेप्रसंगी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना बोरकर पुढे म्हणाल्या, आजचे युग हे कौशल्याधारित शिक्षणाचे आहे.केवळ पदवी मिळवून रोजगाराची वाट पाहण्यापेक्षा एखादे व्यावसायिक कौशल्य आत्मसात करून स्वतःचा व्यवसाय उभारणे ही आजच्या काळाची अपरिहार्य आवश्यकता आहे.त्यामुळे ब्युटी अँड वेलनेस क्षेत्रात अल्प गुंतवणुकीत व्यवसाय सुरू करण्याची संधी उपलब्ध असून, त्यातून आर्थिक स्वावलंबनाबरोबरच समाजात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करता येते.
यावेळी त्यांनी ब्युटी अँड वेलनेस क्षेत्रातील विविध उपचारपद्धती व सौंदर्यसेवेची प्रात्यक्षिके सादर करून दाखवली. त्वचा व केसांची निगा, फेशियल, मेकअप, हेअर स्टायलिंग, ग्राहक सेवा, स्वच्छता आणि व्यावसायिक कामकाजातील बारकावे यांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून त्यांनी विद्यार्थिनींना आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, सेवेतील गुणवत्ता आणि व्यावसायिक कौशल्यांची सखोल माहिती दिली. त्यामुळे विद्यार्थिनींना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळून या क्षेत्रातील रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधींबाबत स्पष्ट मार्गदर्शन लाभले.
या कार्यशाळेस प्रा.जयसिंग चवरे, प्रा. संकेत कुरणे, प्रा.पुजा आवले, प्रा.अवनी कदम, प्रा.माधुरी जाधव आणि महाविद्यालयातील सर्व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ.दिप्ती शेंबेकर यांनी तर आभार प्रा.पुजा आवले यांनी मानले.












