आडाळी एमआयडीसीतील बेकायदेशीर माती उत्खननाची चौकशी सुरू

दोषींवर कडक कारवाई करणार: उद्योगमंत्री उदय सामंत

​सावंतवाडी | प्रतिनिधी :
दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एमआयडीसी (MIDC) परिसरात झालेल्या बेकायदेशीर माती उत्खनन प्रकरणाची उद्योग विभागामार्फत सखोल चौकशी सुरू असून, या प्रकरणात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, अशी ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी येथे दिली. सावंतवाडी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही महत्त्वपूर्ण माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत ॲड. स्वप्नील प्रभू-आजगावकर उपस्थित होते.

​उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले की, आडाळी एमआयडीसीमधील माती उत्खननाबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर शासनाने याची गंभीर दखल घेतली असून तातडीने चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. हा चौकशी अहवाल प्राप्त होताच संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच आडाळी परिसरात फळ प्रक्रिया उद्योग (फ्रूट प्रोसेसिंग इंडस्ट्री) सुरू व्हावेत, यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. आडाळीत नवे उद्योग आणण्याच्या दृष्टीने नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली असून, या बैठकीला आमदार दीपक केसरकर देखील उपस्थित होते, अशी माहिती त्यांनी दिली.

​जनतेला विश्वासात घेऊनच प्रकल्प राबवणार
आजगाव परिसरात नियोजित असलेल्या लोह खनिज प्रकल्प आणि औष्णिक वीज प्रकल्पाबाबत विचारले असता, शासन पूर्णपणे जनतेच्या सोबत आहे, असे मंत्र्यांनी स्पष्ट केले. स्थानिक लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणतेही प्रकल्प लादले जाणार नाहीत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास प्रामुख्याने पर्यटनाच्या माध्यमातून होत असल्याने पर्यटन क्षेत्रालाच आमचे मुख्य प्राधान्य राहील, असेही त्यांनी नमूद केले.

​कुडाळ-मालवण मतदारसंघात भव्य भाषा संशोधन केंद्र
सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाषा भवन उभारण्याबाबत माजी आमदार निलेश राणे यांनी सातत्याने मागणी केली होती. या मागणीची दखल घेत, त्यांच्याच कुडाळ-मालवण मतदार संघात भव्य ‘भाषा संशोधन केंद्र’ उभारण्यात येणार असल्याची घोषणाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळी केली.