बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या फिजिओथेरपी विभागातर्फे अणाव येथे आरोग्य शिबिर;
योग, व्यायाम व उपचारांचे मार्गदर्शन
स्वप्निल कदम-कुडाळ :
बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे संस्था व्यवस्थापक व संस्थापक सदस्य कै. सिद्धेश गाळवणकर यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या फिजिओथेरपी विभागातर्फे अणाव येथील जीवन संजीवनी सेवा ट्रस्ट संचलित आनंदाश्रय वृद्धाश्रमात आरोग्यविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात वृद्धांची आरोग्य तपासणी, फिजिओथेरपी उपचार, योग व व्यायामाचे प्रात्यक्षिक आणि आरोग्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
प्रा. डॉ. वैष्णवी नाईक आणि दीपाली वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली फिजिओथेरपीच्या विद्यार्थ्यांनी वृद्धांची आरोग्य तपासणी करून विविध फिजिओथेरपी उपचार दिले. तसेच वृद्धापकाळात आरोग्याची योग्य काळजी कशी घ्यावी, याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करत विविध व्यायामही करून घेतले.
यावेळी बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थेच्या सीईओ अमृता गाळवणकर यांनी स्वतः तयार केलेल्या खाद्यपदार्थांचे वृद्धांना वाटप केले. विद्यार्थी व शिक्षकांनी वृद्धांशी संवाद साधत त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत काही वेळ त्यांच्यासोबत घालवला. या भेटीमुळे वृद्धाश्रमात आनंददायी वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या निरोगी व आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या शिबिरात फिजिओथेरपी विभागाचे २५ विद्यार्थी तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे प्राध्यापक सहभागी झाले होते. सिद्धेश गाळवणकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त अशा सामाजिक व आरोग्याभिमुख उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल जीवन संजीवनी सेवा ट्रस्टचे आश्रम व्यवस्थापक आणि वृद्धांनी समाधान व्यक्त करून संस्थेचे आभार मानले.
दरम्यान, बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेतही चेअरमन उमेश गाळवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कै. सिद्धेश गाळवणकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा. अरुण मर्गज, प्रा. परेश धावडे, चैताली बांदेकर, मंदार जोशी तसेच विविध विभागांचे शिक्षक, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.











