लोककलावंतांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; अनुदान दुप्पट, नमन आणि जाखडी लोककलांनाही प्रथमच प्रयोगात्मक अनुदान

रत्नागिरी :
रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी लोककला आणि लोककलावंतांसाठी राज्य सरकारने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची घोषणा केली. दशावतारसह विविध लोककला पथकांसाठी 2008 पासून दोन कोटी 22 लाख रुपये असलेले भांडवली आणि प्रयोगात्मक अनुदान आता दुप्पट करून चार कोटी 44 लाख रुपये करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. या निर्णयामुळे लोककला पथकांचे चालक आणि कलाकार या दोघांनाही वाढीव आर्थिक लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याचबरोबर कोकणातील पारंपरिक नमन आणि जाखडी या लोककलांना प्रथमच राज्य शासनाकडून प्रयोगात्मक अनुदान देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी दहा लाख रुपयांपर्यंतच्या अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. भविष्यात राज्यातील इतर लोककलांसाठीही टप्प्याटप्प्याने अनुदान वाढविण्याची भूमिका सरकारची राहील, असेही शेलार यांनी स्पष्ट केले.
मराठी चित्रपट, नाटक, लोककलावंत, वृद्ध कलाकार, सांस्कृतिक पुरस्कार आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांसाठी शासन सातत्याने काम करत असल्याचे सांगताना, महाराष्ट्र हा वृद्ध लोककलावंतांना नियमित मानधन देणारा देशातील एकमेव राज्य असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, वर्षभरात राज्य सरकारच्या माध्यमातून आयोजित होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांची संख्या ३६० वरून तब्बल १,२०० पर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती देत, अधिकाधिक लोककलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा सरकारचा संकल्प असल्याचे त्यांनी नमूद केले.