केतन अग्रवाल हत्या प्रकरण : सिया गोयल आणि चेतन चौधरीच्या कथित विवाहाचा पोलिसांकडून तपास, राजस्थानातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी

केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा तपास अधिक गतीने सुरू असून पोलिस विविध दिशांनी चौकशी करत आहेत. तपासादरम्यान सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी राजस्थानमध्ये गुप्तपणे विवाह केल्याची चर्चा समोर आली आहे. या दाव्याची पडताळणी करण्यासाठी पोलिसांनी राजस्थानातील मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. दरम्यान, सिया आणि चेतन यांची न्यायालयीन कोठडी आज संपत असून त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणात आणखी महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


राजस्थानातील मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पोलिसांकडून तपासणी

पुणे : केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पुणे ग्रामीण पोलिसांनी चौकशीचा वेग वाढवला आहे. तपासादरम्यान सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी राजस्थानमध्ये गुप्तपणे विवाह केल्याची चर्चा समोर आल्यानंतर पोलिसांनी त्या अनुषंगाने तपास सुरू केला. यासाठी राजस्थानातील प्रसिद्ध खाटू श्याम मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. या फुटेजमधून पोलिसांना कोणताही ठोस पुरावा मिळाल्याचे समोर आलेले नाही. तरीही संबंधित माहितीची खातरजमा करण्यासाठी तपास सुरू असून या कथित विवाहामागील सत्य शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रकरणातील प्रत्येक पैलूची बारकाईने तपासणी केली जात असून अग्रवाल कुटुंबीयांनी संबंधित आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे.

आज संपणार न्यायालयीन कोठडी, कुटुंबीयांचे राष्ट्रपतींना भावनिक पत्र

गेल्या सुनावणीत सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर दोघांची येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. आज त्यांची न्यायालयीन कोठडी संपत असून त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. गेल्या काही दिवसांत पोलिसांनी विविध अंगांनी तपास केला असून काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, केतन अग्रवाल यांच्या निर्घृण हत्येमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा मानसिक आघात झाला आहे. मुलाच्या आठवणी, त्याचे फोटो आणि घरातील रिकामी जागा पाहून कुटुंबीय भावूक होत आहेत. आरोपींना कठोर शिक्षा मिळावी आणि न्याय मिळावा, या मागणीसाठी कुटुंबीयांनी राष्ट्रपतींना भावनिक पत्र पाठवले आहे. तसेच केतन यांच्या निधनाच्या धक्क्यात त्यांच्या आजोबांचाही मृत्यू झाल्याने अग्रवाल कुटुंबावर दुहेरी दुःख कोसळल्याची भावना व्यक्त केली जात आहे.