कणकवली बस स्थानकासमोरील त्या स्टॉल मधील कथित प्रकारानंतर नगरपंचायत प्रशासन ॲक्शन मोडवर

उड्डाण पुलाखालचे सर्व स्टॉल आजच हटविण्याचा नगरपंचायतीचा इशारा

कणकवली : कणकवली शहरातील बसस्थानकासमोरील उड्डाण पुलाखाली उभारण्यात आलेले सर्व स्टॉल आजच स्वखर्चाने हटवावेत, अन्यथा नगरपंचायत प्रशासनाकडून थेट कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा कणकवली नगरपंचायतीने संबंधित स्टॉलधारकांना दिला आहे.

 

बसस्थानकासमोरील उड्डाण पुलाखालील एका स्टॉलमध्ये गैरप्रकार सुरू असल्याची घटना काल सायंकाळी समोर आल्यानंतर नगरपंचायत प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत कडक भूमिका स्वीकारली आहे. त्यानंतर संबंधित परिसरातील सर्व अनधिकृत स्टॉल हटविण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

 

नगरपंचायत प्रशासनाने स्टॉलधारकांना स्वयंस्फूर्तीने स्टॉल हटविण्याचे आवाहन केले असून, दिलेल्या मुदतीनंतरही स्टॉल कायम आढळल्यास जेसीबी व इतर यंत्रसामग्रीच्या सहाय्याने हटविण्याची मोहीम राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

 

कारवाईदरम्यान स्टॉलचे अथवा साहित्याचे कोणतेही नुकसान झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित स्टॉलधारकांची राहील, असेही नगरपंचायत प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे उड्डाण पुलाखालील अनधिकृत स्टॉलधारकांमध्ये प्रशासनाच्या या निर्णयामुळे खळबळ उडाली आहे.