JALGAON : उत्तर भारतात मोठी मागणी असलेल्या चक्री भोपळ्याच्या काढणीला चोपडा तालुक्यात सुरुवात; कमी दरामुळे शेतकरी चिंतेत

 

जळगाव : उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर मागणी असलेल्या चक्री भोपळ्याच्या काढणीला जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात सुरुवात झाली आहे. एप्रिल-मे महिन्यात लागवड केलेले भोपळे आता काढणीस आले असून शेतात मजुरांच्या मदतीने काढणी सुरू आहे. मात्र, सध्या मिळत असलेल्या कमी बाजारभावामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

चोपडा तालुक्यातील अनेक शेतकरी चक्री भोपळ्याची लागवड करतात. उत्तर भारतात या भोपळ्याला मोठी मागणी असल्याने हे पीक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे मानले जाते. एप्रिल-मे महिन्यात लागवड केलेले पीक आता काढणीस तयार झाले असून शेतांमध्ये काढणीची लगबग सुरू झाली आहे.

लागवडीपासून काढणीपर्यंत बियाणे, खते, औषधे, सिंचन आणि मजुरी यावर मोठा खर्च होत असतो. मात्र, सध्या चक्री भोपळ्याला प्रतिकिलो अवघा पाच ते सहा रुपयांचा दर मिळत असल्याने उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. किमान दहा रुपये प्रतिकिलो दर मिळाल्यासच हे पीक परवडणारे ठरेल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.दरम्यान, जोखीम कमी करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी चक्री भोपळ्यासोबत आंतरपीक म्हणून मक्याची लागवड केली आहे. भोपळ्याला अपेक्षित दर न मिळाल्यास मक्याच्या उत्पन्नातून काही प्रमाणात आर्थिक भरपाई होईल, अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहेत.