एम क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातून गुणवंत खेळाडूंचा सत्कार

वार्षिक हंगामात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंना केले सन्मानित

सामाजिक कार्यकर्त्या रेखा गायकवाड व डॉ. प्रसाद देवधर यांचाही सन्मान

सावंतवाडी । प्रतिनिधी : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून एम क्रिकेट अकॅडमी सावंतवाडीच्या माध्यमातून गुणवंत खेळाडूंचा वार्षिक सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. एम क्रिकेट अकॅडमीच्या इनडोअर मैदानावर गेल्या वर्षभरात विविध वयोगटात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना यावेळी सन्मानित करण्यात आले.
तसेच माऊली महिला मंडळाच्या माध्यमातून असंख्य महिलांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या तसेच गतिमंद मुलांसाठी शाळा सुरु करुन शिक्षणाचे दालन खुले करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या रेखा गायकवाड तसेच भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून जिल्ह्यासह राज्यभरात विविध सामाजिक उपक्रम राबविणारे सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रसाद देवधर यांचाही एम क्रिकेट अकॅडमी तर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी दोन्ही सत्कारमूर्तींनी आपल्या सामाजिक कार्याची माहिती उपस्थित मुलांना दिली.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने आहारतज्ञ सौरभ वारंग यांनी खेळाडूंना आहार व फिटनेस यासंदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच यावेळी विशेषतज्ञ मार्गदर्शक म्हणून अनिल हळदीवे यांनी मुलांनी कशाप्रकारे तंदुरुस्त राहावे त्याचे मौलिक मार्गदर्शन करीत काही टिप्स दिल्या. खेळाडूंमधून आर्यन दूधवाडकर व नीलांग नाईक तर पालकांमधून श्री. पेडणेकर व श्री. कालेलकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर अध्यक्ष मनोगतात ॲड. परिमल नाईक यांनी मुलांना अकॅडमीच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधांबाबतचा आढावा घेत मुलांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात प्रमुख प्रशिक्षक राहुल रेगे यांनी अकॅडमीने वर्षभरात घेतलेल्या विविध स्पर्धा तसेच सहभागी झालेल्या विविध स्पर्धा व उपक्रमाबाबत माहिती दिली. तसेच वर्षभरात मुलांनी विविध स्पर्धांमध्ये घेतलेला सहभाग व मिळालेले यश याबाबत विस्तृत माहिती विशद केली. तसेच विविध वयोगटातून जिल्हा व राज्यस्तरावर तसेच निवड चाचणीमध्ये यशस्वी ठरलेल्या मुलांनी आपल्या कामगिरीचा स्तर कशाप्रकारे उंच व्हावा याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी अकॅडमीचे अध्यक्ष उदय नाईक, उपाध्यक्ष ॲड. परिमल नाईक, सदस्य प्रसाद सावंत, सल्लागार राजन आंगणे, प्रमुख प्रशिक्षक राहूल रेगे, सहाय्यक प्रशिक्षक अविनाश जाधव आदी उपस्थित होते.

यावेळी वार्षिक हंगामात उत्कृष्ट कामगिरी केलेले खेळाडू १२ वर्षा खालील उत्कृष्ट फलंदाज संचित गावडे व ओम मेस्त्री, १२ वर्षाखालील उत्कृष्ट गोलंदाज पियुष सावंत, दिग्विजयराव देसाई, १४ वर्षाखालील उत्कृष्ट फलंदाज फुदेल आगा, गणेश गावडे, १४ वर्षाखालील उत्कृष्ट गोलंदाज सुहान बांदेकर व दत्ता नाईक, १६ वर्षाखालील उत्कृष्ट फलंदाज इशान कुबडे, १६ वर्षाखालील उत्कृष्ट गोलंदाज आर्यन दुधवाडकर व साहिल नाटलेकर तसेच १९ वर्षाखालील उत्कृष्ट फलंदाज रघुवीर सातोसकर व १९ वर्षा खालील उत्कृष्ट गोलंदाज मनीष निरवडेकर यांच्यासह १२ वर्षाखालील उत्कृष्ट यष्टीरक्षक हर्ष पांढरे, १४ वर्षाखालील उत्कृष्ट यष्टीरक्षक यश पाटकर व १६ वर्षाखालील उत्कृष्ट यष्टीरक्षक मंथन नाईक तसेच जॉन्टी रोडस् ट्रॉफी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अथर्व तोरस्कर यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.
तर मुलींमध्ये उत्कृष्ट फलंदाज रिचा धुरी व उत्कृष्ट गोलंदाज तस्मिया बांदेकर तसेच वर्षभरातील सर्वोत्कृष्ट प्रदर्शन झोया मीर यांनाही गौरविण्यात आले. मुलांमध्ये वर्षभरात सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करणारे खेळाडू रेहान केरकर, निलांग नाईक, नागेश रेगे तर उदयोन्मुख खेळाडू प्रणव राऊळ, अगस्त्य आजगांवकर, आरुष नेवगी, सिद्धांत परब, श्लोक सावंत, मयंक राऊळ व श्रेयस कालेलकर या सर्वांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.