देवळे येथे श्री रवळनाथ देवराईत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

सह्याद्री संकल्प सोसायटी देवरूख, ग्रामपंचायत देवळे व ग्राम समृद्धी अभियान देवळे यांच्यावतीने उपक्रम

देवरूख (प्रतिनिधी):

संगमेश्वर तालुक्यातील देवळे येथील श्री देव रवळनाथ मंदिर देवराई येथे सह्याद्री संकल्प सोसायटी देवरुख, ग्रामपंचायत देवळे व ग्राम समृद्धी अभियान देवळे यांच्यातर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवण्यात आला.

या कार्यक्रमासाठी “सह्याद्री संकल्प सोसायटी” देवरुखचे सदस्य विराज आठल्ये, व महेंद्र चव्हाण उपस्थित होते. यावेळी ग्रामसमृद्धी अभियान देवळेचे अध्यक्ष निलेश कोळवणकर, रवळनाथ ट्रस्टचे अध्यक्ष गजानन काळोखे, यशवंत घागरे, भाऊ कानडे, संतोष परशेटे, दिनेश परशेटे, अनंत खातू बंधू, बाबा गुरव तसेच सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश कोळवणकर यांनी केले. यावेळी सह्याद्री संकल्प सोसायटीचे सदस्य विराज आठले व महेंद्र चव्हाण यांचे ग्रामसमृद्धी अभियान तर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यांनी केलेल्या हॉर्नबिल संवर्धनाचा आढावा यावेळी घेण्यात आला.

त्यांच्या या योगदाना विषयी कृतज्ञता व्यक्त करून पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष संवर्धन गरजेचे असल्यामुळे सर्वांनी मिळून वृक्ष संवर्धन करण्याचा संकल्प केला. या कार्यक्रमाला अनुसरून उपस्थित सर्व ग्रामस्थांनी सह्याद्री संकल्प सोसायटीने उपलब्ध केलेल्या दुर्मिळ वृक्षांचे वृक्षारोपण केले. देवळे येथील कड्याजवळच्या स्मशानभूमी जवळ अशा दुर्मिळ वृक्षांची लागवड करून तिथे एक बाग तयार करण्याचा संकल्प करण्यात आला. रवळनाथ देवराईत आणलेला सर्व वृक्षांची लागवड करून या कार्यक्रमाची सांगता झाली. स्मशानाजवळील जागेत वृक्षारोपण करण्यासाठी सह्याद्री संकल्प सोसायटीने दुर्मिळ वृक्ष उपलब्ध करून दिले असून त्याबद्दल त्यांना देवळे ग्रामस्थांच्या वतीने धन्यवाद देण्यात आले असून पुढे असेच सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली.