देवरूख (प्रतिनिधी):
देवरुख शहरातील कांजीवरा तिठा परिसरातील मैत्री पंपाजवळ असलेल्या सुर्वे यांच्या घराजवळ काल सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास अचानक एक भला मोठा अजगर आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली.
घराच्या परिसरात अजगर दिसताच स्थानिक नागरिकांनी वेळ न घालवता तातडीने स्थानिक सर्पमित्रांशी संपर्क साधला. माहिती मिळताच सर्पमित्रांच्या पथकाने क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोहोचलेल्या सर्पमित्रांनी अतिशय सतर्कतेने आणि कौशल्याने अजगराला कोणत्याही प्रकारची दुखापत न पोहोचवता सुखरूप पकडले. या मोहिमेत खालील सर्पमित्र व स्थानिक ग्रामस्थांनी सहभाग घेतला. यामध्ये प्रमोद पुसाळकर, आर्य बेर्डे, वाक्षे सर, युयुत्सू आर्ते, दुर्वांकुर बेर्डे, दिलीप पाटेकर, महेश बेर्डे सर्पमित्रांनी दाखवलेले हे धाडस आणि तत्परतेमुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. अजगराला सुरक्षितपणे पकडल्यानंतर सर्पमित्रांनी त्याला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन केले. वनविभाग या अजगराला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे मुक्त करणार आहे. सर्पमित्रांनी दाखवलेल्या या समयसूचकतेबद्दल परिसरातील नागरिकांकडून त्यांचे विशेष कौतुक होत आहे.












